Local Body Elections 2025: जळगाव जिल्हा परिषद निवडणुकीत आरक्षणामुळे दिग्गजांची अडचण; महायुतीत संभ्रम कायम
जळगाव जिल्हा परिषद निवडणुकीत आरक्षणामुळे दिग्गजांची अडचण; महायुतीत संभ्रम कायम
जळगाव जिल्हा परिषद निवडणुकांसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. ५० टक्के महिलांच्या आरक्षणामुळे दिग्गज उमेदवार अडचणीत आले आहेत. महायुतीबाबत संभ्रम कायम असून महाविकास आघाडी एकत्र येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सायली मेमाणे
पुणे ३ ऑक्टोबर २०२५ : जळगाव : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. अद्याप अधिकृत तारीख जाहीर नसली तरी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. झेडपी निवडणुकीचे बिगुल वाजले असून इच्छुकांनी मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा परिषदेच्या ६८ गटांतील १३४ जागांसाठी निवडणूक होणार असून ५० टक्के महिलांच्या आरक्षणामुळे अनेक दिग्गजांचे गणित बिघडले आहे.
अध्यक्षपद सर्वसाधारण असल्याने त्यासाठी मोठी रस्सीखेच अपेक्षित आहे. मागील निवडणुकीत महिला राखीव असलेले अध्यक्षपद यंदा खुल्या वर्गासाठी असल्याने अनेक जण तयारीत आहेत. भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यात युतीबाबत संभ्रम कायम आहे. त्यामुळे महायुतीत “एकटा चलोरे” ही भूमिका दिसत आहे.
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र लढण्याची शक्यता आहे. जर ही आघाडी एकत्र आली तर महायुतीसमोर तगडे आव्हान उभे राहू शकते. दरम्यान, आरक्षणाच्या फेरबदलामुळे माजी सदस्यांना धक्का बसला असून त्यांच्या पत्नींना उमेदवारी देण्याची चर्चा सुरू आहे.