Maharashtra Air Pollution Crisis: राज्यातील 17 शहरांनी राष्ट्रीय मर्यादा ओलांडली; मुंबई–MMRची हवा गंभीर धोक्यात
Maharashtra Air Pollution Crisis: राज्यातील 17 शहरांनी राष्ट्रीय मर्यादा ओलांडली; मुंबई–MMRची हवा गंभीर धोक्यात
महाराष्ट्रातील 17 शहरांमध्ये PM 2.5 आणि PM 10 प्रदूषण राष्ट्रीय मानकांपेक्षा जास्त. मुंबई–MMRची हवा चिंताजनक; NCAP निधीचा कमी वापर, हिवाळ्यात आरोग्य धोक्यात. संपूर्ण अहवाल वाचा.
सायली मेमाणे
१४ नोव्हेंबर २०२५ : महाराष्ट्रातील हवेची गुणवत्ता झपाट्याने बिघडत असून राज्यातील 17 प्रमुख शहरांनी PM 2.5 ची राष्ट्रीय मर्यादा ओलांडल्याचा धक्कादायक खुलासा नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालातून समोर आला आहे. ‘एन्वारोकॅटलिस्ट’ आणि ‘वातावरण फाउंडेशन’ यांनी CPCB च्या मागील आठ वर्षांच्या आकडेवारीवर आधारित संयुक्त अभ्यास सादर केला असून, महाराष्ट्रातील हवा राष्ट्रीय मानकांच्या तुलनेत सातत्याने अधिक प्रदूषित होत चालल्याचे यात नमूद आहे. मुंबईसह संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर पोहोचली असून, आगामी हिवाळ्यात या शहरांतील नागरिकांना गंभीर आरोग्यधोका संभवत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
अहवालानुसार, राज्यातील सर्व 17 शहरांनी PM 2.5 च्या 40 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटरच्या राष्ट्रीय मर्यादेपेक्षा जास्त प्रदूषण नोंदवले आहे. याहून गंभीर बाब म्हणजे राज्यातील प्रत्येक मोठ्या शहरात PM 10 ची पातळी राष्ट्रीय मानकांपेक्षा अधिक आढळली आहे. एवढेच नव्हे, तर जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मानकांच्या तुलना करता प्रदूषणाची पातळी अनेक पट वाढलेली आहे. मुंबईसारख्या महानगरात PM 2.5 पातळी 35 मायक्रोग्रॅम आणि PM 10 पातळी तब्बल 91 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर नोंदवली गेली असून, WHO मानकांच्या तुलनेत ही पातळी सुमारे सातपट जास्त असल्याचे स्पष्ट होते.
राज्यात NCAP अर्थात राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमासाठी अब्जावधी रुपयांचा निधी मंजूर असूनही त्याचा वापर अपुरा असल्याचे अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. NCAP अंतर्गत महाराष्ट्राला 938.59 कोटी रुपये निधी मंजूर झाला; मात्र प्रत्यक्षात केवळ 574.64 कोटींचाच वापर झाला. निधी उपलब्ध असूनही प्रकल्पांची अंमलबजावणी, स्थानिक प्रशासनातील समन्वय आणि नियोजनाचा अभाव यामुळे हवेची गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. हिवाळ्यात तापमान घटल्यामुळे प्रदूषक जमिनीवर थरथरून बसतात आणि नागरिकांच्या श्वसनसंस्थेला गंभीर हानी पोहोचवतात.
मुंबई आणि MMR प्रदेशातील शहरांची स्थिती तर अधिकच बिघडलेली आहे. नवी मुंबईत PM 10 ची पातळी 102 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटरपर्यंत पोहोचली असून, पाच वर्षांत यात जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. ठाण्यात PM 2.5 पातळी 38 तर PM 10 पातळी 83 मायक्रोग्रॅमपर्यंत गेली आहे. बांधकामांमधून उडणारी धूळ, वाहतूक, कचरा जाळणे आणि औद्योगिक प्रकल्प हे यामागील प्रमुख घटक मानले जात आहेत. मीरा-भाईंदर, विरार आणि बदलापूर या उपनगरांमध्येही हवा प्रदूषणाची पातळी महानगराइतकीच किंवा त्याहूनही जास्त झाली आहे. बदलापूर, भिवंडी आणि बेलापूरमध्ये PM 10 पातळी 100 मायक्रोग्रॅमपेक्षा अधिक नोंदली गेली असून, हिवाळ्यात ती अत्यंत धोकादायक स्तरावर पोहोचते.
‘एन्वारोकॅटलिस्ट’चे संस्थापक सुनील दहिया यांनी इशारा देताना म्हटले आहे की महाराष्ट्रातील बहुतेक शहरांमध्ये धूलिकणांची पातळी चिंताजनक असून, NCAP च्या चौकटीपलीकडे जाऊन कठोर उपाययोजना करण्याची वेळ आली आहे. अहवालात काही महत्त्वाच्या शिफारसी देण्यात आल्या आहेत—प्रदूषणग्रस्त पण ‘नॉन-NCAP’ शहरांना कार्यक्रमात तातडीने सामावून घेणे, हिवाळ्यापूर्वी ‘सीझनल अॅक्शन प्लॅन’ लागू करणे, कामगिरीआधारित निधी वितरण करणे आणि हवा गुणवत्ता निरीक्षण केंद्रांचा विस्तार करणे यांचा यात समावेश आहे.
राज्यातील वाढते हवेचे प्रदूषण सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका निर्माण करत असून, श्वसनाचे आजार, दमा, हृदयविकार यांसारख्या समस्यांमध्येही वाढ होत आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रणासाठी तातडीने कठोर आणि प्रभावी पावले उचलणे हीच काळाची मागणी बनली आहे.