Maharashtra Government New GR: आमदार-खासदार आल्यावर अधिकाऱ्यांनी उठून उभे राहावे, नम्र भाषेत संवाद—नवीन मार्गदर्शक सूचना जारी

0
Maharashtra Government New GR: आमदार-खासदार आल्यावर अधिकाऱ्यांनी उठून उभे राहावे, नम्र भाषेत संवाद—नवीन मार्गदर्शक सूचना जारी

Maharashtra Government New GR: आमदार-खासदार आल्यावर अधिकाऱ्यांनी उठून उभे राहावे, नम्र भाषेत संवाद—नवीन मार्गदर्शक सूचना जारी

Maharashtra New Guidelines: आमदार-खासदारांशी वागणुकीसाठी राज्य सरकारने नवीन GR जारी केला. अधिकाऱ्यांनी उभे राहणे, नम्र भाषा वापरणे, पत्रव्यवहाराची नोंद ठेवणे अनिवार्य. नियम मोडल्यास कारवाईची तरतूद.


सायली मेमाणे

पुणे २१ नोव्हेंबर २०२५ : महाराष्ट्र शासनाने सरकारी कार्यालयांमध्ये आमदार आणि खासदारांसारख्या लोकप्रतिनिधींशी अधिकाऱ्यांनी कसे वागावे यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या GR नुसार लोकप्रतिनिधी कार्यालयात आले की अधिकाऱ्यांनी जागेवरून उठून उभे राहणे, त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकणे आणि संवाद साधताना सदैव नम्र भाषा वापरणे बंधनकारक ठरणार आहे. फोनवरील संभाषणापासून प्रत्यक्ष भेटीपर्यंत अधिकारी आता अधिक सजग आणि सतर्क राहावे लागणार आहेत. या मार्गदर्शक सूचनांमुळे प्रशासनातील कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक जण याला ‘पुढाऱ्यांची आरती ओवळण्याची सक्ती’ असेही म्हणत आहेत.

नवीन GR गुरुवारी राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला. शासन निर्णयात असे नमूद करण्यात आले आहे की, लोकप्रतिनिधींना योग्य सन्मान देणे हे प्रशासनाविषयीचा विश्वास वाढवणारे आणि जबाबदारीची जाणीव करून देणारे आहे. साधारणपणे शासकीय अधिकाऱ्यांकडून सर्वसामान्य नागरिकांना चांगली वागणूक देण्याची अपेक्षा असते, मात्र प्रत्यक्षात तसा अनुभव येत नाही, अशी अप्रत्यक्ष टीका या GR मध्ये दिसून येते. परंतु लोकप्रतिनिधींची बेअदबी होणार नाही यासाठी सरकारने विशेष काळजी घेतल्याचेही यातून स्पष्टपणे जाणवते.

GR मध्ये आणखी काही कठोर तरतुदी करण्यात आल्या आहेत. विभागांनी लोकप्रतिनिधींशी संबंधित सर्व पत्रव्यवहाराची स्वतंत्र नोंदवही ठेवावी लागेल. दोन महिन्यांच्या आत त्या पत्रांना उत्तरे देणे अनिवार्य केले असून, जर त्या कालावधीत उत्तर देणे शक्य नसेल तर संबंधित अधिकारी स्वतः लोकप्रतिनिधीला त्याबाबत माहिती देणे बंधनकारक आहे. यामुळे प्रशासनातील विलंब टाळण्याचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.

या GR मधील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सरकारी प्रशिक्षण संस्थांच्या अभ्यासक्रमात ‘सौजन्य’ शिकवण्याचा विशेष प्रशिक्षण घटक समाविष्ट केला जाणार आहे. म्हणजेच भविष्यातील अधिकारी आणि कर्मचारी लोकप्रतिनिधींशी नम्र, आदरयुक्त आणि सौजन्यपूर्ण वर्तन कसे करावे हे औपचारिकरीत्या शिकणार आहेत. प्रशासनातील कर्मचाऱ्यांसाठी हा एक वेगळाच अनुभव ठरणार आहे.

या निर्णयाच्या मागील कारणांबाबत बोलायचे झाले तर, काही दिवसांपासून अनेक लोकप्रतिनिधी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून मुजोरी होत असल्याच्या तक्रारी करत होते. वेळ न देणे, बैठकींना टाळाटाळ करणे, पत्रव्यवहाराकडे दुर्लक्ष करणे यांसारखे आरोप मोठ्या प्रमाणावर नोंदवले जात होते. सत्ताधारी पक्षातील काही आमदारांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली होती. अखेर शासनाने जुन्या परिपत्रकांना एकत्र करून नवीन GR जारी करत स्पष्ट नियमावली लागू केली आहे. सुशासन, पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवणे हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचा दावा या GR मध्ये करण्यात आला असला तरी त्याची अंमलबजावणी कशी होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

या नवीन निर्णयामुळे सरकारी कार्यालयांतील अधिकाऱ्यांवर वर्तन, भाषा, शिस्त आणि लोकप्रतिनिधींशी संवाद याबाबत अधिक बंधने येणार आहेत. काहीजण या GR चे स्वागत करत असले तरी अनेक कर्मचारी वर्गामध्ये अस्वस्थता जाणवत आहे. ‘बोले तो अदब दिखानेका, शांत खडा रहनेका’ असा सूर प्रशासनात उमटताना दिसत आहे. पुढील काही दिवसांत या GR चा परिणाम प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील नात्यावर कसा होतो, आणि नागरिकांच्या दैनंदिन कामकाजावर त्याचा काय परिणाम दिसतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed