Maharashtra Health Scheme: मोठ्या प्रत्यारोपणांसाठी 20 लाखांपर्यंत मदत; आयुष्मान व महात्मा फुले योजनेत मोठा बदल
Maharashtra Health Scheme: मोठ्या प्रत्यारोपणांसाठी 20 लाखांपर्यंत मदत; आयुष्मान व महात्मा फुले योजनेत मोठा बदल
महाराष्ट्र सरकारने आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेत मोठा बदल करत प्रत्यारोपणांसाठी मदत 20 लाखांपर्यंत वाढवली. यकृत, हृदय, फुफ्फुस प्रत्यारोपणांसह अनेक उपचार आता कॅशलेस उपलब्ध.
सायली मेमाणे
१४ नोव्हेंबर २०२५ महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात एक मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. आयुष्मान भारत-Pradhan Mantri Jan Aarogya Yojana (ABPMJAY) आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना (MJPJAY) अंतर्गत आता मोठ्या प्रत्यारोपणांसाठी 20 लाख रुपये पर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे. हृदय, फुफ्फुस, यकृत अशा महागड्या आणि गुंतागुंतीच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियांना सामान्य नागरिकांनाही परवडणारे करण्याचा उद्देश या निर्णयामागे आहे. यासंबंधीचा सरकारी आदेश 14 ऑक्टोबर 2025 रोजी जारी करण्यात आला असून, त्यानंतरपासून ही सुधारित मदत लागू झाली आहे.
पूर्वी या योजनांमध्ये कुटुंबांना केवळ 5 लाखांपर्यंतच आर्थिक मदत मिळत होती. त्यामुळे महागड्या प्रत्यारोपण शस्त्रक्रिया या मर्यादेत करणे जवळपास अशक्य होते. अनेक रुग्णांना उपचारांपासून वंचित राहावे लागत होते किंवा कर्जबाजारी होण्याची वेळ येत होती. आरोग्य विभागाने या समस्येवर सखोल अभ्यास केला आणि 5 लाखांपेक्षा जास्त खर्च असलेल्या नऊ प्रमुख आजारांसाठी आर्थिक मदत वाढवण्याची शिफारस सरकारकडे केली. ही शिफारस 15 सप्टेंबर 2025 रोजी मान्य झाली आणि प्रत्यारोपणांसाठी मदतीची मर्यादा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली.
नवीन दरानुसार यकृत प्रत्यारोपणासाठी 22 लाख, हृदय-फुफ्फुस एकत्र प्रत्यारोपणासाठी 20 लाख, तर फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी 20 लाख रुपये इतकी कमाल मदत मंजूर करण्यात आली आहे. हृदय प्रत्यारोपणासाठी 15 लाख, TAVI/TAVR प्रक्रियेसाठी 20 लाख आणि TMVR उपचारांसाठी 10 लाख रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. अस्थिमज्जा प्रत्यारोपणासाठी 9.5 ते 17 लाख रुपयांपर्यंत मदत मिळणार आहे. या सर्व उपचारांसाठीचा खर्च अत्यंत मोठा असल्याने गरीब आणि निम्न-मध्यमवर्गीय रुग्णांसाठी हा निर्णय वरदान ठरणार आहे.
राज्य आरोग्य आश्वासन संस्थेला या निधीचा थेट वापर करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच भविष्यातील दावे पूर्ण करण्यासाठी काही रक्कम राखीव निधीत ठेवली जाणार आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये प्रत्यारोपण सेवा देणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ते देण्यासही मान्यता देण्यात आली आहे. यामुळे सरकारी रुग्णालयांची क्षमता आणि सेवा गुणवत्ता वाढण्यास मदत होईल.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्रतेसाठी काही आवश्यक कागदपत्रांची गरज आहे. आयुष्मान किंवा रेशन कार्ड आणि आधार, पॅन, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, अपंगत्व प्रमाणपत्र यांसारखे कोणतेही वैध ओळखपत्र आवश्यक आहे. MJPJAY अंतर्गत अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपर्यंत असावे. या योजनेत वयाची कोणतीही मर्यादा नसून सर्व उपचार पूर्णपणे कॅशलेस पद्धतीने सूचीबद्ध सरकारी आणि खासगी रुग्णालयांत मिळतील.
या निर्णयामुळे अत्यंत महागडे असलेले प्रत्यारोपण उपचार लाखो नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्र सरकारचा हा उपक्रम आरोग्य क्षेत्रात परिवर्तन घडवणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. राज्यातील गंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांना नवजीवन देण्याची क्षमता या निर्णयात आहे.