गणेश विसर्जनावेळीही मुसळधार पावसाची शक्यता, मुंबई-पुण्यासह अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

0

महाराष्ट्रात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता. अनंत चतुर्दशीच्या दिवशी (५ सप्टेंबर) मुंबई, पुणे, रायगड, ठाणे या भागात ऑरेंज अलर्ट. हवामान विभागाचा इशारा, नागरिकांनी सतर्क राहावे.

सायली मेमाणे

पुणे ३ सप्टेंबर २०२५ : महाराष्ट्रात सध्या गणेशोत्सव सुरू असून पावसानेही जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील तीन दिवस राज्यभर मुसळधार पावसाची शक्यता आहे. गणेश चतुर्थीपासून सुरू झालेला पाऊस आता अनंत चतुर्दशीपर्यंत कायम राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे गणेश विसर्जनावेळीही पावसाचे सावट राहणार आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना हवामान विभागाचा अलर्ट तपासणे आवश्यक आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

आज दिनांक ३ सप्टेंबर रोजी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. याशिवाय जळगाव आणि अमरावती जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून मुंबई आणि ठाण्यालाही यलो अलर्ट जारी आहे.

४ सप्टेंबर रोजी हवामान विभागाने रत्नागिरी, रायगड, मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक आणि धुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. महाराष्ट्रातील अर्ध्याहून अधिक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे. यामुळे पुढील २४ ते ४८ तासांमध्ये अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

५ सप्टेंबर हा अनंत चतुर्दशीचा दिवस असून या दिवशी राज्यभरात गणेश विसर्जनाची मिरवणूक काढली जाते. पुण्यात अनंत चतुर्दशीला मोठ्या प्रमाणावर मिरवणूक होते. मात्र यंदा या मिरवणुकीवर पावसाचे सावट आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रायगड, ठाणे, पुणे आणि घाट परिसर या भागात मुसळधार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे धुळे, परभणी, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मिरवणूक आणि विसर्जनावेळी अडचणी येण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार, नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, घराबाहेर पडताना छत्री वा रेनकोटचा वापर करावा आणि नाल्याजवळ, पाणथळ भागात जाणे टाळावे. गणेश विसर्जनासाठी जाणाऱ्या भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. मुंबई, पुणे, ठाणे यासह अनेक शहरांमध्ये पावसामुळे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता असल्याने पोलिस आणि पालिका प्रशासनाकडून विशेष व्यवस्था करण्यात येत आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असल्यामुळे नद्या-नाल्यांमध्ये पाणीपातळी वाढण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पाणी साचून नागरिकांचे हाल होऊ शकतात. त्यामुळे पुढील तीन दिवस सर्वांनी हवामान विभागाचा अलर्ट पाहूनच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *