Mithi River Mumbai: मिठी नदीत ७६% काम झाल्यावर थांबले, नव्या निविदेची शक्यता
मिठी नदीत ७६% काम झाल्यावर थांबले, नव्या निविदेची शक्यता
मिठी नदीची फक्त ७६% सफाई पूर्ण; पावसाळ्यानंतरच उर्वरित काम, नव्या निविदेसाठी मुंबई महापालिकेची तयारी.
सायली मेमाणे
मुंबई ७ जुलै २०२५ : Mithi River Mumbai: मुंबईतील महत्त्वाच्या मिठी नदीची गाळ उपसण्याची आणि स्वच्छता मोहिम सध्या थांबलेली असून, यंदाच्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही स्थिती चिंतेची बनली आहे. पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येणाऱ्या गाळ उपशाच्या कामांचा वेग काहीसा संथ झाल्याने, मुंबई महानगरपालिका आता नव्या निविदा काढण्याच्या प्रक्रियेकडे वळली आहे. विशेष म्हणजे, एकीकडे मुंबईतील नालेसफाईचे काम सरासरी ८९ टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले असले तरी मिठी नदीचे काम मात्र ७६ टक्क्यांवरच अडकले आहे. यामुळे परिसरात पावसाचे पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुंबई महापालिकेने यंदा शहरातील नाले व नद्यांमधून सुमारे ९.७९ लाख मेट्रिक टन गाळ उपसण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यातील ८० टक्के काम ३१ मेपूर्वी पूर्ण करणे अपेक्षित होते, तर उर्वरित २० टक्के काम पावसाळ्याच्या सुरुवातीस करणे आवश्यक होते. शहर व उपनगरातील मोठ्या नाल्यांचे काम पूर्ण झाले असले तरी छोट्या नाल्यांमध्ये ७९ टक्के आणि मिठी नदीमध्ये केवळ ७६ टक्केच काम झाले. मिठी नदीतून २.१४ लाख मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट होते, मात्र प्रत्यक्षात केवळ ५६ टक्के काम १ जून २०२५ पर्यंत झाले आणि नंतर काम थांबवण्यात आले.
या कामांमधील विलंबामागे एका मोठ्या घोटाळ्याचे सावट आहे. मिठी नदीतील गाळ उपसा घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दोन कंत्राटदार आणि काही पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. एका कंत्राटदाराला तर काळ्या यादीतही टाकण्यात आले आहे. परिणामी, कंत्राटदारांची संख्या कमी झाल्याने कामावर परिणाम झाला. परिणामी महत्त्वाचे सफाई काम रेंगाळले आहे आणि पर्यायी कंत्राटदार शोधण्याचे काम देखील अपेक्षित प्रतिसाद मिळवू शकलेले नाही. मुंबई आणि उपनगरांतील इतर कंत्राटदारांनाही विचारणा करण्यात आली होती, मात्र मिठी नदीतील कामाची गुंतागुंत आणि भौगोलिक अडचणी लक्षात घेता कोणीही या कामात विशेष रस दाखवलेला नाही.
महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले की, पावसाळ्यादरम्यान मिठी नदीतील गाळ उपसा शक्य नाही, त्यामुळे या कामांसाठी पावसाळ्यानंतर नव्याने निविदा काढण्यात येणार आहे. सध्या केवळ तरंगता कचरा काढण्याचे काम चालू ठेवण्यात येणार आहे. मिठी नदीची स्वच्छता तीन टप्प्यांमध्ये करण्यात येते आणि प्रत्येक टप्प्यासाठी वेगवेगळ्या कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली होती, परंतु घोटाळ्यानंतर ही प्रणाली अयशस्वी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबईसारख्या महानगरात मिठी नदीच्या साफसफाईचे महत्त्व प्रचंड आहे. पावसाळ्यात ही नदी भरून वाहू लागल्यास परिसरातील सखल भागांमध्ये पाणी साचण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे यापुढील काळात या कामांवर विशेष लक्ष दिले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीप्रमाणे, पावसाळ्यानंतर तातडीने नव्या निविदा प्रक्रिया राबवून उर्वरित कामे पूर्ण केली जातील, अशी आशा आहे.