Vasai News : गोविंदांच्या सुरक्षेसाठी विम्याबाबत वसई-विरार महापालिकेत महत्त्वपूर्ण बैठक
गोविंदांच्या सुरक्षेसाठी विम्याबाबत वसई-विरार महापालिकेत महत्त्वपूर्ण बैठक
वसई-विरार महापालिकेच्या मुख्यालयात दहीहंडी उत्सवासाठी गोविंदांना विमा कवच देण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
सायली मेमाणे
पुणे ७ जुलै २०२५ :वसई-विरार महापालिकेच्या मुख्यालयात नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत येत्या दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी विमा योजनांबाबत सखोल चर्चा करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रात येणाऱ्या महिनाभरामध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असून, वसई-विरार महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात उत्सव अधिक गर्दीने आणि जोशात पार पडतो. त्यामुळे यावर्षी प्रशासनाने गोविंदांच्या सुरक्षेचा विशेष विचार करत विमा आणि इतर उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यासाठी ही बैठक आयोजित केली.
या बैठकीला प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, पोलीस प्रशासन, पालघरचे खासदार डॉ. हेमंत सावरा, वसई-विरारचे पहिले महापौर राजू पाटील, आयुक्त अनिल कुमार पवार तसेच महाराष्ट्र दहीहंडी असोसिएशनचे अध्यक्ष बाळा पडेलकर उपस्थित होते. याशिवाय वसई-विरार परिसरातील अनेक दहीहंडी पथकांचे प्रतिनिधी आणि अध्यक्षही सहभागी झाले होते.
बैठकीत प्रशासनाने स्पष्टपणे सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेच्या वतीने प्रत्येक पथकातील गोविंदासाठी मोफत विमा उपलब्ध करून देण्यात येतो. मात्र, काही पथकांकडून किंवा गोविंदांकडून याकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी, अपघात झाल्यावर सहाय्यासाठी उशिरा पाठपुरावा केला जातो. यामुळे अनावश्यक अडथळे निर्माण होतात. अशा स्थिती पुन्हा ओढवू नयेत म्हणून विमा घेणे अनिवार्य असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
विमा योजनांसह, सुरक्षित दहीहंडी आयोजनेसाठी योग्य आराखडा तयार करण्याबाबत देखील बैठकीत चर्चा झाली. उंची मर्यादा, गटांची नोंदणी, अपघात नियंत्रण, तत्काळ वैद्यकीय मदत, पोलीस बंदोबस्त आणि गर्दी नियंत्रण यासारख्या मुद्द्यांवर सविस्तर विचारमंथन करण्यात आले.
या बैठकीत उपस्थित महाराष्ट्र दहीहंडी असोसिएशनचे अध्यक्ष बाळा पडेलकर यांनीही विमा अनिवार्यतेला पाठिंबा दर्शवित गोविंदांच्या कुटुंबांचे हित जोपासण्यासाठी या धोरणाची अंमलबजावणी महत्वाची असल्याचे सांगितले. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, दहीहंडी ही केवळ एक पारंपरिक स्पर्धा नसून, ती तरुणांच्या एकतेचे प्रतीक आहे. म्हणूनच, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी संपूर्ण समाजाची आहे.
वसई-विरार महापालिकेच्या या पुढाकारामुळे दहीहंडी पथकांमध्ये सकारात्मक प्रतिसाद उमटत असून, अधिकाधिक पथकांनी विमा योजना स्वीकाराव्यात, असा संदेश यामुळे पोहोचला आहे. प्रशासनाने सूचित केले की, यंदा विम्याच्या नोंदणीसाठी ऑनलाईन फॉर्म प्रणाली सुद्धा सुरु करण्यात येईल, जेणेकरून पारदर्शकता आणि गती मिळेल.