MNS vs BJP: भेंडीबाजारावरून वाद चिघळला, संदीप देशपांडेंचं नितेश राणेंना प्रत्युत्तर

MNS vs BJP: भेंडीबाजारावरून वाद चिघळला, संदीप देशपांडेंचं नितेश राणेंना प्रत्युत्तर
मीरा रोडवरील अमराठी दुकानदाराला मारहाणीवरून नितेश राणे यांनी मनसेला भेंडीबाजारात जाऊन हिंमत दाखवण्याचे आव्हान दिले. यावर संदीप देशपांडेंनी भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिले असून राजकीय वातावरण तापले आहे.
सायली मेमाणे
मुंबई ४ जुलै २०२५ : नितेश राणे विरुद्ध मनसे वाद चिघळला: ‘भेंडीबाजारला जा’ वक्तव्यावर संदीप देशपांडेंचं जशास तसं प्रत्युत्तर
मीरा रोडवरील अमराठी दुकानदाराला मनसे कार्यकर्त्यांनी चापट मारल्याच्या घटनेनंतर राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी मनसेवर टीका करत म्हटलं होतं, “जर हिंमत असेल, तर भेंडीबाजार, मोहम्मद अली रोडसारख्या भागात जा आणि टोपीवाल्यांना मारून दाखवा.” या वक्तव्यावर मनसे नेते संदीप देशपांडेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
नितेश राणे यांनी जाहीरपणे मनसेच्या कृतीवर टीका करताना म्हटलं होतं की, “जो दुकानदार मारला गेला, तो हिंदू होता. जर हिंमत असेल, तर भेंडीबाजार, नळबाजार किंवा मोहम्मद अली रोडला जाऊन असली हिम्मत दाखवावी. त्या परिसरात कोण मराठी बोलतो?” यावर देशपांडेंनी प्रत्युत्तर देताना भाजपच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला आणि मनसेचा भूतकाळ आठवून दिला.
संदीप देशपांडे म्हणाले, “रझा अकादमीच्या मोर्चात पोलीस भगिनींवर हल्ला झाला तेव्हा मनसे एकटाच भिडला होता. तेव्हा भाजपचे सगळे नेते शेपटं घालून बसले होते. त्यामुळे आता काठ्या चालवणाऱ्यांनी तलवार चालवायला शिकवू नये.” त्यांनी हेही म्हटलं की, “ज्यांना ‘श’चा उच्चार येत नाही, ते भाजपवाले आता मीरा-भाईंदरमध्ये आंदोलन फूस लावत आहेत.”
या प्रकरणामुळे मीरा-भाईंदरमधील भाजपमध्येही नाराजीची लाट उसळली आहे. भाजपचे प्रभाग अध्यक्ष कुंदन मानकर यांनी पक्षाला रामराम ठोकून थेट मनसेत प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे भाजपमध्ये अंतर्गत खदखदही वाढली आहे.
या वादात संदीप देशपांडे यांनी ट्विट करत स्पष्ट इशारा दिला आहे – “बेपारी आहात, बेपार करा. आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका. महाराष्ट्रात मराठीचा अपमान कराल, तर कानाखाली बसेल.” त्यांनी भाजपला आणि अमराठी समर्थन करणाऱ्यांना थेट उद्देशून इशारा दिला आहे की, मराठीचा अपमान खपवून घेतला जाणार नाही.
या संपूर्ण प्रकरणामुळे मराठी अभिमान, हिंदुत्व आणि भाषिक अस्मिता या मुद्द्यांभोवती जोरदार राजकीय धुरळा उडाला आहे. भाजप आणि मनसे यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होत असून येत्या काळात यावरून आणखी राजकीय घमासान रंगण्याची शक्यता आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter