MSEDCL Hikes Tariffs: दिवाळीच्या तोंडावर वीज दरवाढ, प्रति युनिट ३५ पैशांपासून ९५ पैसे अधिक
दिवाळीच्या तोंडावर वीज दरवाढ, प्रति युनिट ३५ पैशांपासून ९५ पैसे अधिक
Maharashtra Electricity Price Hike: दिवाळीच्या तोंडावर महावितरणने वीज दरात वाढ जाहीर केली. प्रति युनिट ३५ पैशांपासून ९५ पैसे इंधन समायोजन शुल्क (FAC) आकारले जाणार. घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना बसणार मोठा फटका.
सायली मेमाणे
पुणे ६ ऑक्टोबर २०२५ :MSEDCL Hikes Tariffs News: ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या तोंडावर राज्यातील वीज ग्राहकांना महावितरणने (MSEDCL) दरवाढीचा मोठा शॉक दिला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या वीज बिलांमध्ये प्रति युनिट ३५ पैशांपासून ते ९५ पैशांपर्यंत ‘इंधन समायोजन शुल्क’ (Fuel Adjustment Charges – FAC) आकारण्यात आले आहे. यामुळे घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक अशा सर्वच श्रेणीतील ग्राहकांच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे.
महावितरणने १ ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या परिपत्रकात सांगितले आहे की सप्टेंबर महिन्यातील वीज वापरासाठी हे शुल्क आकारले जाणार आहे. विशेष म्हणजे, जुलै महिन्यात वीज दरात कपात केल्याचा दावा केला गेला होता. मात्र लगेचच ऑगस्टच्या बिलात अतिरिक्त शुल्क आकारण्यास सुरुवात झाली आणि आता सप्टेंबरच्या वापरावरही ही वाढ लागू केल्याने ग्राहक नाराज झाले आहेत.
प्रति युनिट वाढ किती?
- १ ते १०० युनिट वापर: प्रति युनिट ३५ पैसे
- १०१ ते ३०० युनिट वापर: प्रति युनिट ६५ पैसे
- ३०१ ते ५०० युनिट वापर: प्रति युनिट ८५ पैसे
- ५०१ युनिटपेक्षा जास्त वापर: प्रति युनिट ९५ पैसे
महावितरणच्या मते, राज्यातील वाढत्या वीज मागणीमुळे त्यांना खुल्या बाजारातून (Open Market) जास्त दराने वीज खरेदी करावी लागली. तसेच उच्च उत्पादन खर्च (High Production Cost) असलेल्या युनिट्सचा वापर करावा लागल्याने हा अतिरिक्त खर्च झाला आहे. हा भार इंधन समायोजन शुल्काच्या स्वरूपात ग्राहकांकडून वसूल केला जात आहे.
मात्र, दिवाळीच्या काळात अशी वाढ लागू केल्याने ग्राहक संघटना आणि उद्योग क्षेत्राकडून तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे.