Mumbai Air Pollution: “ज्वालामुखीवर खापर फोडू नका” — मुंबईतील खराब हवेवर हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
Mumbai Air Pollution: “ज्वालामुखीवर खापर फोडू नका” — मुंबईतील खराब हवेवर हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
Mumbai Air Pollution: इथिओपियातील ज्वालामुखीवर दोष देऊ नका, मुंबईतील हवा आधीपासूनच खराब होती, असे हायकोर्टाचे स्पष्ट निरीक्षण. AQI 300+, दृश्यमानता कमी; उपाययोजनांवर सरकारला विचारणा.
सायली मेमाणे
पुणे २८ नोव्हेंबर २०२५ : मुंबईतील वाढत्या वायूप्रदूषणाच्या गंभीर परिस्थितीवर मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा कठोर भूमिका घेतली आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून हवेची गुणवत्ता सतत खालावत असून, दृश्यमानतेतही मोठी घट झाल्याने न्यायालयाने स्वतःहून दखल घेत सुमोटो याचिका दाखल केली आहे. याच प्रकरणाच्या सुनावणीत इथिओपियातील ज्वालामुखीची राख मुंबईत आली आणि त्यामुळे हवा दूषित झाली, असा दावा अतिरिक्त सरकारी वकिलांनी केला. मात्र हा दावा उच्च न्यायालयाने तात्काळ फेटाळला आणि सरकारच्या युक्तिवादावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की, “दोन दिवसांपूर्वी ज्वालामुखीचा उद्रेक झाला नव्हता, तरीसुद्धा मुंबईतील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब होती.” हायकोर्टाने प्रश्न उपस्थित केला की शहरातील हवेचा दर्जा आधीच खराब असताना त्यासाठी ज्वालामुखीला दोष देणे ही दिशाभूल करणारी भूमिका आहे. त्यामुळे सरकारने या समस्येकडे गंभीरपणे पाहून तत्काळ प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी न्यायालयाची कडक सूचना होती.
मुंबईतील हवेचा AQI 300 च्या पुढे गेल्याचे याचिकाकर्त्यांचे वकील डी. खंबाटा यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. AQI 300+ म्हणजे ‘खराब’ ते ‘अतिशय खराब’ श्रेणी. एवढेच नव्हे तर शहरातील दृश्यमानता इतकी कमी झाली आहे की 500 मीटरच्या पुढील वस्तू स्पष्ट दिसत नाहीत, असेही न्यायालयाला सांगण्यात आले. याची स्वतः न्यायालयाने दखल घेतली आणि ही परिस्थिती नागरिकांसाठी धोकादायक असल्याचे निरीक्षण नोंदवले.
इथिओपियातील ज्वालामुखी दोन दिवसांपूर्वी उद्रेक झाला आणि त्याची राख हिंद महासागर ओलांडून भारतात पोहोचल्यामुळे प्रदूषण वाढले, असा मुद्दा सरकारकडून मांडण्यात आला होता. परंतु न्यायालयाने स्पष्ट पुराव्यांच्या आधारे हा दावा फेटाळला. ज्वालामुखी उद्रेकापूर्वीही मुंबईतील हवा खराब होती, अशा शब्दांत न्यायालयाने सरकारचे कान टोचले.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने सरकारला विचारले की दिल्लीच्या धर्तीवर मुंबईत प्रदूषण नियंत्रणासाठी कोणत्या ठोस उपाययोजना केल्या जातील? केवळ बाह्य कारणांवर दोष देऊन स्थानिक स्रोतांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही, असेही न्यायालयाने नमूद केले.
दरम्यान, 2023 मध्येही हीच सुमोटो याचिका न्यायालयासमोर आली होती, परंतु परिस्थितीत जास्त सुधारणा झालेली दिसत नाही. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भुषण गगराणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिका हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी काही तातडीच्या उपाययोजना राबवत आहे. शहरात महत्त्वाच्या ठिकाणी पाणी फवारणी सुरू करण्यात आली आहे, रस्ते धूळमुक्त करण्यासाठी स्वच्छता वाढवण्यात आली आहे आणि जे प्रकल्प वायूप्रदूषण वाढवतात त्यांना तातडीने काम थांबवण्यास सांगण्यात आले आहे.
मुंबईचा वाढता बांधकामाचा वेग, वाहतूककोंडी, धूळकणांचे प्रमाण, औद्योगिक उत्सर्जन आणि हवामानातील बदल — हे सर्व घटक प्रदूषण वाढवणारे असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे. ज्वालामुखीची राख हा तात्पुरता आणि नगण्य घटक असू शकतो, पण स्थानिक पातळीवर सुधारणा करणे सर्वाधिक आवश्यक आहे, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
हायकोर्टाच्या कडक निरीक्षणांनंतर आता राज्य सरकार आणि महापालिकेवर प्रभावी प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी आणखी वाढली आहे. आगामी सुनावणीत सरकार कोणती पावले उचलणार आणि मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी कोणता रोडमॅप मांडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information