Mumbai Cruise Hub: 556 कोटींचे आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल तयार; ५ भव्य क्रूझसह पर्यटनात ‘मेगा बूम’
Mumbai Cruise Hub: 556 कोटींचे आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल तयार; ५ भव्य क्रूझसह पर्यटनात ‘मेगा बूम’
मुंबईत 556 कोटी खर्चून उभारलेले आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल कार्यान्वित. एकाचवेळी ५ क्रूझ, १० लाख प्रवासी क्षमता आणि श्रीलंका, मालदीव, दुबई, सिंगापूरसाठी सेवा.
सायली मेमाणे
पुणे २१ नोव्हेंबर २०२५ : मुंबईत जागतिक दर्जाच्या पर्यटनाला मोठी चालना देणारा आणि भारताच्या समुद्री पर्यटन क्षेत्रासाठी महत्त्वाचा टप्पा ठरलेला आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल अधिकृतपणे कार्यान्वित झाले आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल (MICT) नावाने ओळखल्या जाणाऱ्या या प्रकल्पासाठी तब्बल 556 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या टर्मिनलमध्ये एकाच वेळी ५ मोठ्या क्रूझ जहाजांना थांबण्याची क्षमता असल्याने मुंबई आता जागतिक क्रूझ मॅपवर एक महत्त्वपूर्ण गंतव्य म्हणून उदयास येत आहे.
या नव्या टर्मिनलमधून मुंबईतून गोवा, कोची, लक्षद्वीप, श्रीलंका, मालदीव, दुबई, सिंगापूर, मलेशिया आणि थायलंडसारख्या आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळांकडे थेट क्रूझ सेवांची सुविधा उपलब्ध आहे. क्रूझमधील प्रवाशांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा, विस्तृत लाउंज, आधुनिक इमिग्रेशन प्रणाली, 72 चेक-इन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन काउंटर यांसारख्या सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
MICT ही भारतातील सर्वात मोठी क्रूझ सुविधा असून पहिल्या दोन मजल्यांवर मिळून 2,07,000 चौरस फूट क्षेत्रफळावर हे अत्याधुनिक टर्मिनल उभारले गेले आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी 22 लिफ्ट, 10 एक्सेलेटर, मोठ्या प्रतीक्षालयांची व्यवस्था, तसेच एकाचवेळी 300 हून अधिक वाहनांच्या पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे. टर्मिनलची रचना लहरी छताच्या शैलीत केली असून समुद्राच्या लाटांना तोंड देण्यासाठी अतिशय मजबूत संरचना वापरण्यात आली आहे. संपूर्ण टर्मिनल सुमारे 4.15 लाख चौरस फूट क्षेत्रात पसरले असून भविष्यातील पर्यटन प्रकल्पांसाठी देखील यामध्ये विस्ताराची क्षमता आहे.
भारतातील क्रूझ पर्यटनाला नवसंजीवनी देण्यासाठी केंद्र सरकारने क्रूझ इंडिया मिशन अंतर्गत या प्रकल्पाला विशेष प्राधान्य दिले आहे. दरवर्षी जवळपास 10 लाख प्रवाशांना हाताळण्याची क्षमता असलेल्या या टर्मिनलमुळे भारतातील समुद्री पर्यटनाची व्याप्ती आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. एकाच दिवशी 15,000 पर्यटकांची वाहतूक करण्याची क्षमता ही या प्रकल्पाची मोठी ताकद मानली जात आहे. मुंबईतून सुरु होणाऱ्या क्रूझ सेवेमुळे भारताच्या सांस्कृतिक पर्यटनाला, किनारी पर्यटनाला आणि आंतरराष्ट्रीय व्यापार संधींना नवा वेग मिळण्याची शक्यता आहे.
मुंबई ही ऐतिहासिकदृष्ट्या समुद्री व्यापाराचे केंद्र राहिले आहे. 1690 पासूनची ही परंपरा 1873 मध्ये बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या स्थापनेनंतर अधिक मजबूत झाली. आजही मुंबई पोर्ट अथॉरिटी भारतातील सर्व महत्त्वाच्या समुद्री उपक्रमांचे केंद्रबिंदू आहे. या ऐतिहासिक वारशाला आधुनिक रूप देत, सरकारने मुंबईला देशाचे अग्रगण्य क्रूझ हब बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. नव्या टर्मिनलमुळे हे स्वप्न आता साकार होताना दिसत आहे.
प्रचंड गतीने वाढणारा क्रूझ पर्यटन बाजार, वाढता परदेशी प्रवासी ओढा, तसेच देशांतर्गत पर्यटनातील नवे ट्रेंड्स यामुळे MICT हा प्रकल्प भारतासाठी ‘गेम चेंजर’ ठरणार आहे. पर्यावरणीय शाश्वततेचे भान ठेवत पर्यटन वाढवण्याचे उद्दिष्टही या प्रकल्पामागे आहे. विशाल अधोसंरचना, अत्याधुनिक सुविधा आणि जागतिक दर्जाचे क्रूझ जोडणीमुळे मुंबई आता आशियातील महत्त्वपूर्ण क्रूझ गंतव्यांपैकी एक बनण्याची तयारी करत आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information