Mumbai Metro 3 Aqua Line: वरळी–कफ परेड मार्ग सुरू; पाहा नवीन भूमिगत स्टेशन्सचा फर्स्ट लुक
वरळी–कफ परेड मार्ग सुरू; पाहा नवीन भूमिगत स्टेशन्सचा फर्स्ट लुक
Mumbai Metro 3 Aqua Line पूर्ण क्षमतेने सुरू! वरळी ते कफ परेड दरम्यान 11 नवीन भूमिगत स्टेशन उघडणार. पाहा स्टेशन्सचे फर्स्ट लुक आणि खास वैशिष्ट्ये.
सायली मेमाणे
पुणे ६ ऑक्टोबर २०२५ : मुंबईकरांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. बहुप्रतिक्षित मुंबई मेट्रो-3 (Mumbai Metro-3) म्हणजेच ‘अक्वा लाईन’ (Aqua Line) आता पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी सज्ज झाली आहे. वरळी (Worli) ते कफ परेड (Cuffe Parade) या महत्त्वाच्या अंतिम टप्प्याचे काम पूर्ण झाले असून, त्यामुळे आता कफ परेड ते सीप्झ/आरे पर्यंतची अखंड मेट्रो कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे.
या मार्गात एकूण 11 अत्याधुनिक भूमिगत स्थानकांचा समावेश असून, यात विज्ञान केंद्र, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल इंटरचेंज, ग्रँट रोड, गिरगाव, काळबादेवी, सीएसएमटी, हुतात्मा चौक, चर्चगेट, विधान भवन आणि कफ परेड या स्थानकांचा समावेश आहे. ही सर्व स्टेशन आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून, मुंबईच्या वारशाला देखील या डिझाईनमध्ये महत्त्व देण्यात आले आहे.
मुंबई मेट्रो-3 चा हा अंतिम टप्पा सुरू झाल्यानंतर दक्षिण मुंबई ते उपनगर यामधील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. सध्या रोड ट्रॅफिकमुळे मुंबईकरांना दररोज प्रवासासाठी तासन्तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मात्र, भूमिगत मेट्रो-3 सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच प्रवास करणे शक्य होईल.
प्रमुख स्थानकांबद्दल बोलायचे झाल्यास, विज्ञान केंद्र (Science Centre) हे स्टेशन नेहरू विज्ञान केंद्र, नेहरू तारांगण, महालक्ष्मी मंदिर, हाजी अली दर्गा आणि फिनिक्स पॅलेडियम मॉलकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी सोयीस्कर ठरणार आहे. महालक्ष्मी (Mahalaxmi) स्थानकाद्वारे पश्चिम रेल्वेचे महालक्ष्मी स्थानक, मोनोरेल तसेच महालक्ष्मी रेसकोर्सला जोडणी मिळेल. तर मुंबई सेंट्रल (Mumbai Central Interchange) स्थानक हे उपनगरीय रेल्वे आणि आंतरराज्य बसस्थानकाशी थेट इंटरचेंज देणार आहे.
ग्रँट रोड (Grant Road) हे स्टेशन शहरातील व्यापारी, बाजारपेठा, शाळा आणि रुग्णालयांशी थेट कनेक्टिव्हिटी निर्माण करणार आहे. यामुळे दैनंदिन प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि हुतात्मा चौक (Hutatma Chowk) यांसारख्या महत्त्वाच्या भागातही या मेट्रो लाईनमुळे सहज प्रवास करता येईल. शेवटचे कफ परेड (Cuffe Parade) स्थानक हे या मेट्रो लाईनचे टर्मिनल असून, दक्षिण मुंबईच्या महत्त्वाच्या व्यावसायिक व निवासी भागांपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सुलभ होणार आहे.
मुंबई मेट्रोकडून सर्व स्थानकांचे फर्स्ट लुक फोटोही शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये आधुनिक आर्किटेक्चर, आकर्षक डिझाईन आणि प्रवाशांसाठी उच्चस्तरीय सोयी-सुविधा दाखवण्यात आल्या आहेत. या स्टेशनच्या डिझाईनमध्ये मुंबईच्या परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम पाहायला मिळतो.
मुंबईकरांसाठी ही मेट्रो लाईन केवळ प्रवासाचा वेग वाढवणारी ठरणार नाही, तर वाहतूक कोंडी कमी करून पर्यावरणपूरक प्रवासाचाही पर्याय देईल. या प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर मुंबई मेट्रोचे जाळे अधिक बळकट होणार असून, शहराच्या विकासाला नवे बळ मिळणार आहे.