Mumbai University Convocation 2026: ‘या’ दिवशी होणार दीक्षांत समारंभ; दीड लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना पदव्या
Mumbai University Convocation 2026: ‘या’ दिवशी होणार दीक्षांत समारंभ; दीड लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना पदव्या
Mumbai University चा वार्षिक दीक्षांत समारंभ 17 जानेवारी 2026 रोजी फोर्ट येथील सर कावसजी जहाँगीर सभागृहात होणार. दीड लाखांहून अधिक स्नातकांना पदव्या प्रदान.
पुणे २० डिसेंबर २०२५ : मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ शनिवार, १७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता मुंबईतील ऐतिहासिक सर कावसजी जहाँगीर दीक्षांत सभागृह, फोर्ट येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील मुंबई विद्यापीठाची भक्कम वाटचाल अधोरेखित करणारा हा दीक्षांत समारंभ विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानाचा क्षण ठरणार आहे.
या दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तसेच मुंबई विद्यापीठाचे कुलपती आचार्य देवव्रत भूषवणार आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली होणारा हा शैक्षणिक सोहळा विद्यापीठाच्या परंपरेला साजेसा ठरणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. यावर्षीच्या दीक्षांत समारंभासाठी भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्रा. अजय कुमार सूद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून ते दीक्षांतपर भाषण करणार आहेत. विज्ञान, संशोधन आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण तसेच संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्यासह मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे आणि कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे उपस्थित राहणार आहेत. याशिवाय अधिसभा, व्यवस्थापन परिषद आणि विद्यापरिषद यांचे मान्यवर सदस्य, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता, संलग्न महाविद्यालयांचे प्राचार्य, विभागप्रमुख आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी दिली आहे.
या दीक्षांत समारंभात मुंबई विद्यापीठातील विविध विद्याशाखांमधून पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण होऊन पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना अधिकृत पदव्या प्रदान करण्यात येणार आहेत. यावर्षी तब्बल दीड लाखाहून अधिक स्नातकांना विविध पदव्या प्रदान केल्या जाणार असून, हा समारंभ विद्यापीठाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या शैक्षणिक सोहळ्यांपैकी एक ठरणार आहे.
याच समारंभात विविध विद्याशाखांतील एकूण ५७७ संशोधक विद्यार्थ्यांना विद्यावाचस्पती म्हणजेच पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील २५६, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील १४४, मानव्यविज्ञान विद्याशाखेतील १०६ आणि आंतर-विद्याशाखीय अभ्यासशाखेतील ७१ संशोधक विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
तसेच विद्यापीठाच्या विविध परीक्षांमध्ये विशेष प्राविण्य संपादन केलेल्या १९ गुणवंत विद्यार्थ्यांना २१ सुवर्णपदके मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. या सुवर्णपदक विजेत्यांमध्ये १२ मुली आणि ७ मुलांचा समावेश आहे. याशिवाय दोन विशेष स्पर्धा पारितोषिके देखील यावेळी प्रदान करण्यात येणार आहेत.
मुंबई विद्यापीठाचा हा दीक्षांत समारंभ केवळ पदवी प्रदान करण्याचा कार्यक्रम नसून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. उच्च शिक्षण, संशोधन आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रातील विद्यापीठाची भक्कम वाटचाल अधोरेखित करणारा हा सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत विद्यापीठ प्रशासनाने व्यक्त केले आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information