MVA Press Conference: जयंत पाटीलचा राज्य निवडणूक आयोगावर मोठा आरोप, “सर्व्हर कोणीतरी दुसरं चालवतंय”
जयंत पाटीलचा राज्य निवडणूक आयोगावर मोठा आरोप, “सर्व्हर कोणीतरी दुसरं चालवतंय”
महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी मतदार यादीतील त्रुटी व तांत्रिक गडबडीवर नाराजी व्यक्त केली. राज्य निवडणूक आयोगावर मोठा आरोप केला आहे.
सायली मेमाणे
पुणे १५ ऑक्टोबर २०२५ : महाविकास आघाडीच्या (MVA) नेत्यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाशी चर्चा केली आहे. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मतदार यादीतील गंभीर त्रुटी व तांत्रिक गडबडीवर आपली नाराजी व्यक्त केली. त्यांनी थेट असा आरोप केला की, “महाराष्ट्र निवडणूक आयोगाचा सर्व्हर कुणीतरी दुसरं चालवतंय.”
जयंत पाटील म्हणाले की, त्यांनी आणि इतर विरोधी पक्षांनी मतदार यादीतील चुकीचे मुद्दे निवडणूक आयोगासमोर मांडले आहेत. “काल आम्ही सर्व विरोधी पक्षांनी निवडणूक आयुक्तांना भेटून मतदार यादीतील अनंत चुका दाखवल्या आणि त्यावर निवेदन दिले. केंद्रीय आयुक्तांनी ही माहिती केंद्राला पाठवण्याचे आश्वासन दिले,” असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्य निवडणूक आयोगाला भेटीत त्यांनी काही महत्वाचे पुरावे देखील सादर केले. पाटील म्हणाले, “मतदार यादीत अनेक चुका आहेत. काही लोक पत्त्यावर राहतच नाहीत. मुरबाड मतदार संघात आमच्या कार्यकर्त्यांनी त्रुटी दाखवल्या, ज्यामुळे श्रीमती गुप्ता यांचे नाव यादीतून काढण्यात आले. आमचा प्रश्न आहे की, ही नावं कोणी काढली आणि फोटो तपासणी कोणी केली?” या सर्व घटनांवरून त्यांनी गंभीर निष्कर्ष काढला आहे की, राज्य निवडणूक आयोगाचा सर्व्हर कुणीतरी दुसरं चालवत असल्याचा संशय आहे.
जयंत पाटील यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीची आठवण करून दिली आणि म्हटले की, “गेल्या निवडणुकीत अनेक त्रुटी आढळल्या. विधानसभेतील मतदानाचे सिस्टीम मोडले गेले आणि मतदान टक्केवारी जाहीर केली गेली नाही. जर याच मतदान याद्या पुन्हा वापरल्या गेल्या, तर तीच चूक पुन्हा होऊ शकते.”
या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित होते. त्यांनी मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाला दबाव आणण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले.
राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घटना महत्त्वाची ठरली आहे. जयंत पाटील यांच्या आरोपांनंतर निवडणूक आयोगाकडून या सर्व प्रश्नांची योग्य ती तातडीने दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.