Nagpur Blast: नागपुरातील RDX निर्मिती कंपनीत भीषण स्फोट, 1 कामगार ठार; 4 गंभीर जखमी
Nagpur Blast: नागपुरातील RDX निर्मिती कंपनीत भीषण स्फोट, 1 कामगार ठार; 4 गंभीर जखमी
नागपूरजवळील बाजारगाव येथे सोलर एक्सप्लोसिव्स लिमिटेडमध्ये RDX निर्मिती दरम्यान स्फोट झाला. यात एका कामगाराचा मृत्यू, तर 4 गंभीर जखमी झाले आहेत. गेल्या दोन वर्षांत अशा स्फोटांत 17 हून अधिक जीव गेले आहेत.
सायली मेमाणे
पुणे ४ सप्टेंबर २०२५ : नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव येथील सोलर एक्सप्लोसिव्स लिमिटेडमध्ये मध्यरात्री झालेल्या स्फोटाने परिसर हादरला. हा स्फोट CB 1 प्लांटमध्ये झाला असून, या ठिकाणी HMX, TNT आणि RDX सारखी उच्च क्षमतेची स्फोटके तयार केली जातात. स्फोट इतका तीव्र होता की त्याचा आवाज आणि कंप दूरवर जाणवला. या घटनेत मयूर नावाच्या एका कामगाराचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी आहेत. हे सर्व आयसीयूमध्ये दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याशिवाय 9 कामगार किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.
स्फोटानंतर प्रचंड धूर निघत असल्याचं दिसून आल्यानंतर तातडीने कामगारांना बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी टळली असली तरी मृत्यू झालेल्या कामगाराला स्फोटातून उडालेल्या दगडाचा फटका बसल्याने प्राण गमवावे लागले. कारखान्यातील इमारतींचे मोठे नुकसान झाले असून मलब्याचे तुकडे दूरवर फेकले गेले.
सोलर एक्सप्लोसिव्स लिमिटेडमध्ये हा पहिलाच अपघात नाही. याच ठिकाणी 17 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या भीषण स्फोटात 9 कामगारांचा मृत्यू झाला होता आणि 3 जण गंभीर जखमी झाले होते. अशा वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांमुळे नागपूर आणि विदर्भातील स्फोटके तयार करणाऱ्या कारखान्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
नागपूर जिल्ह्यासह भंडारा, वर्धा आणि अमरावती परिसरात अनेक सरकारी आणि खासगी स्फोटके तयार करणारे कारखाने आहेत. या ठिकाणी लष्करी वापरासाठी बॉम्ब, अग्निबाण, शस्त्रे आणि दारुगोळ्याचे उत्पादन केले जाते. मात्र गेल्या काही वर्षांत अशा कारखान्यांत झालेल्या अपघातांनी चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे.
24 जानेवारी 2025 रोजी भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर येथील ऑर्डीनेस फॅक्टरीमध्ये झालेल्या स्फोटात सात कामगारांचा मृत्यू झाला होता, तर पाच जण जखमी झाले होते. यापूर्वी 27 जानेवारी 2024 रोजी याच ठिकाणी आणखी एक स्फोट होऊन एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. मे 2016 मध्ये वर्ध्यातील पुलगाव सीएडी कॅम्पमध्ये झालेल्या भीषण आगीत 17 जणांचा बळी गेला होता.
याशिवाय 13 जून 2024 रोजी अमरावती मार्गावरील धामना येथील चामुंडी एक्सप्लोजिव कंपनीत झालेल्या स्फोटात नऊ कामगारांचा मृत्यू झाला होता. या सर्व घटनांमुळे विस्फोटक कारखान्यांमधील सुरक्षिततेच्या नियमांचे पालन कितपत काटेकोरपणे केले जाते, हा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.
नागपूरजवळच्या सोलर एक्सप्लोसिव्स लिमिटेडमध्ये झालेल्या नव्या स्फोटामुळे कामगारांच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे. गेल्या दोन वर्षांत 17 हून अधिक कामगारांचे जीव अशा दुर्घटनांमध्ये गेले आहेत. सरकार आणि संबंधित प्रशासनाकडून सुरक्षा उपाययोजना अधिक कठोरपणे राबविण्याची मागणी होत आहे.