Nashik CBI Raid : इगतपुरीतील रेन फॉरेस्ट रिसॉर्टवर CBI छापा; कोट्यवधींची रोकड, 71 मोबाइल, 44 लॅपटॉप आणि लक्झरी कार जप्त
Nashik CBI Raid : इगतपुरीतील रेन फॉरेस्ट रिसॉर्टवर CBI छापा; कोट्यवधींची रोकड, 71 मोबाइल, 44 लॅपटॉप आणि लक्झरी कार जप्त
नाशिकच्या इगतपुरीतील रेन फॉरेस्ट रिसॉर्टवर CBI ची कारवाई; आंतरराष्ट्रीय फसवणूक रॅकेट उघड, 1.20 कोटी रोकड, 71 मोबाइल, 44 लॅपटॉप, 500 ग्रॅम सोने आणि 7 लक्झरी कार जप्त.
सायली मेमाणे
पुणे ११ ऑगस्ट २०२५ : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे CBI ने एका प्रसिद्ध रेन फॉरेस्ट रिसॉर्टवर धाड टाकून मोठ्या आंतरराष्ट्रीय फसवणूक रॅकेटचा भांडाफोड केला आहे. या कारवाईत CBI ने 44 लॅपटॉप, 71 मोबाइल फोन, 1.20 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड, 500 ग्रॅम सोने आणि तब्बल एक कोटी रुपयांच्या 7 लक्झरी कार जप्त केल्या आहेत. या प्रकरणाने संपूर्ण नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेन फॉरेस्ट रिसॉर्टमध्ये बेकायदेशीरपणे आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर चालवले जात होते. या कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिका, कॅनडा आणि इतर देशांतील नागरिकांना लक्ष्य करून फसवणुकीचे कॉल केले जात होते. गिफ्ट कार्ड, क्रिप्टोकरन्सी गुंतवणूक आणि इतर आकर्षक योजनांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली जात होती. या गैरव्यवसायासाठी तब्बल 60 जणांची नियुक्ती करण्यात आली होती, जे रिसॉर्टच्या चार खोल्यांतून हा बेकायदेशीर कॉल सेंटर चालवत होते.
शेतीसंबंधित व्यवसायासाठी खोल्या बुक केल्याचे भासवून प्रत्यक्षात या खोल्यांतून परदेशातील नागरिकांना फसवण्याचे काम सुरू होते. CBI ने छापा टाकल्यावर घटनास्थळावरून मिळालेल्या साहित्याने या रॅकेटचे प्रमाण आणि व्याप्ती स्पष्ट झाली आहे.
या कारवाईनंतर CBI ने रिसॉर्ट मालक, कर्मचारी आणि या प्रकरणाशी संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू केली आहे. मुंबईतील BKC येथील CBI कार्यालयात आरोपींची जबाब नोंदवली जात आहे. आतापर्यंत मुंबईतील 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत हे आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेले रॅकेट असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
याशिवाय, बँक अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने या प्रकरणातील गुंतागुंत अधिक वाढली आहे. CBI कडून तांत्रिक पुरावे, ई-मेल ट्रेल्स आणि आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू आहे. जप्त केलेल्या लॅपटॉप्स व मोबाइलमधून मोठ्या प्रमाणावर फसवणुकीचे पुरावे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या प्रकरणाने सायबर क्राईमविरोधातील कारवाईत CBI ची भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. इगतपुरीसारख्या पर्यटनस्थळी बेकायदेशीर व्यवसायाचे जाळे उभारले जाणे हे चिंताजनक आहे. प्रशासनाकडून यापुढे अशा प्रकारच्या रिसॉर्ट्स व व्यावसायिक स्थळांवर अधिक सतर्क नजर ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.