Navale Bridge Accident: नवले ब्रिजवर भीषण अपघात; 9 जणांचा मृत्यू, मुरलीधर मोहोळांनी घटनास्थळी घेतला आढावा
नवले ब्रिजवर भीषण अपघात; 9 जणांचा मृत्यू, मुरलीधर मोहोळांनी घटनास्थळी घेतला आढावा
पुण्यात नवले ब्रिजजवळ भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू, 20 जखमी. दोन कंटेनर व कारला आग. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, PMC आयुक्त व पोलिस आयुक्त यांनी पाहणी करून उपाययोजनांचा आढावा घेतला.
सायली मेमाणे
१४ नोव्हेंबर २०२५ पुणे–बंगळुरू महामार्गावरील नवले ब्रिज परिसरात पुन्हा एकदा भीषण अपघाताने हाहाकार माजवला आहे. गुरुवारी (दि. 13) सायंकाळी तीन वाहनांच्या भीषण धडकेत दोन कंटेनर आणि एक कार पूर्णपणे जळून खाक झाली. या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे 20 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. परिसरातील नागरिकांनी घटना पाहताच धावाधाव करून मदतकार्य सुरू केले, परंतु आगीचा भडका इतका मोठा होता की बचावकार्य अत्यंत कठीण झाले होते.
अपघाताची माहिती मिळताच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यासोबत पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम आणि पोलिस आयुक्त अमितेश कुमार उपस्थित होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नवले ब्रिज परिसराची पाहणी करून अपघाताचे प्राथमिक कारण काय असावे, वाहतूक व्यवस्थापनात कोणत्या त्रुटी आहेत आणि असे अपघात टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत, याचा सखोल आढावा घेतला. या भागात यापूर्वीही गंभीर अपघात झाले असल्याने प्रशासनाला विशेष दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार तीनही वाहने एकाच दिशेने वेगात जात होती. त्याच वेळी पुढे असलेल्या कंटेनरचा ब्रेक अचानक निकामी झाला. अचानक थांबलेल्या कंटेनरमध्ये मागून येणाऱ्या कारची जोरदार धडक झाली, तर आणखी एक कंटेनर वेग कमी करू न शकल्याने दोन्ही वाहनांवर आदळला. या तिहेरी धडकेनंतर काही सेकंदातच दोन्ही कंटेनरना आग लागली, ज्यात मधोमध अडकलेली कार पूर्णपणे जळून खाक झाली. कारमध्ये एका कुटुंबातील सात जण प्रवास करत असल्याची माहिती समोर आली असून, त्यांचा मृत्यू आगीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ट्रॅव्हलर बसमधील काही प्रवासीही या दुर्घटनेत जखमी झाले आहेत.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अपघातानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर आग भडकली की महामार्गावर धुराचे ढग पसरले. काही वाहनचालकांनी वाहनं मागे घेण्याचा प्रयत्न केला, मात्र वाहतूक आधीच कोंडीत अडकली होती. पोलिसांच्या प्राथमिक अहवालानुसार या अपघातात सात ते आठ वाहनांचे नुकसान झाले आहे. अनेक दुचाकी आणि छोटे वाहनही जळाल्याचे समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलीस, अग्निशमन दल, आपत्कालीन पथके आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. पोलिसांकडून मृतदेह बाहेर काढण्याचे, पंचनामा करण्याचे आणि वाहतूक सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. काही काळ महामार्ग पूर्णपणे बंद ठेवावा लागला होता, मात्र नंतर वाहतूक आंशिकपणे पुन्हा सुरू करण्यात आली.
अपघातामुळे महामार्गावर अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ट्रॅफिक पोलिसांनी वाहतूक वळवून मार्ग मोकळा करण्याचे प्रयत्न केले. या भीषण अपघातामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नवले ब्रिज परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे या भागातील रस्त्यांची रचना, प्रकाशयोजना, वेगमर्यादा, वाहतूक नियंत्रण उपाययोजना आणि सुरक्षा यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सिंहगड पोलिसांनी अपघाताचे नेमके कारण, वाहनचालकांची निष्काळजीपणा आणि प्रशासनातील त्रुटी तपासण्यासाठी चौकशी सुरू केली आहे. नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून नवले ब्रिज परिसरात कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना, पथदिवे, सीसीटीव्ही आणि वेग नियंत्रण यंत्रणा उभारण्याची मागणी वाढत आहे.