नवी मुंबई डी. बी.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधान मोदींकडून उद्घाटन

0
नवी मुंबई डी. बी.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधान मोदींकडून उद्घाटन

नवी मुंबई डी. बी.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधान मोदींकडून उद्घाटन

नवी मुंबईतील डी. बी.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोबरला होणार आहे. ५० हजार लोकांच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा पार पडणार.


सायली मेमाणे

पुणे ६ ऑक्टोबर २०२५ : नवी मुंबई शहर आणि राज्याच्या विकासासाठी ऐतिहासिक ठरणारा क्षण समीप आला आहे. बुधवारी, ८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डी. बी.. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. या भव्य सोहळ्यासाठी जोरदार तयारी सुरू असून, तब्बल ५० हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील मान्यवर, तसेच अन्य नामवंत व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.

हा विमानतळ नवी मुंबईच्या तसेच संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी एक मोठा टप्पा मानला जात आहे. मुंबई विमानतळावर वाढत असलेली गर्दी कमी करण्यासाठी हा विमानतळ महत्त्वपूर्ण ठरणार आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी सुलभ सुविधा उपलब्ध करून देत हा विमानतळ आर्थिक विकासालाही चालना देईल. उद्योग, पर्यटन आणि व्यापार क्षेत्राला नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नवी मुंबई आणि परिसरातील नागरिकांमध्ये या उद्घाटन सोहळ्याबाबत प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. अनेकांनी या क्षणाची वर्षानुवर्षे प्रतीक्षा केली असून अखेर आता तो ऐतिहासिक दिवस उगवणार आहे. विमानतळ परिसरात सजावट, सुरक्षेची काटेकोर व्यवस्था आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी विशेष योजना आखण्यात आल्या आहेत. कार्यक्रमाला येणाऱ्या मान्यवर आणि नागरिकांच्या सोयीसाठी पोलीस आणि प्रशासनाचे मोठे पथक तैनात केले गेले आहे.

या विमानतळाच्या माध्यमातून नवी मुंबईला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक महत्त्व प्राप्त होणार आहे. केवळ वाहतुकीच्या सोयीपुरतेच नव्हे तर रोजगारनिर्मिती आणि आर्थिक व्यवहारांच्या वाढीसाठीही हा प्रकल्प उपयुक्त ठरेल. हजारो लोकांना या प्रकल्पामुळे रोजगाराच्या नव्या संधी मिळतील, अशी अपेक्षा आहे.

या उद्घाटन सोहळ्याला केवळ विकासाची छटा नाही तर राजकीय दृष्टीनेही मोठे महत्त्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या विमानतळाच्या उद्घाटनातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे केवळ विकास प्रकल्पाच्या नजरेनेच नव्हे तर राजकीय दृष्टिकोनातूनही पाहिले जात आहे.

नवी मुंबईकरांसाठी हा सोहळा अभिमानाचा क्षण ठरणार असून, संपूर्ण राज्याच्या प्रगतीची दिशा बदलणारा हा विमानतळ भविष्यातील महाराष्ट्राचा नवा चेहरा ठरेल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed