Navi Mumbai Traffic Chaos: ‘ट्रॅफिक पोलिसांचे रेट कार्ड?’ नागरिक संतप्त; ओव्हरलोड डम्पर, बेकायदा प्रवासी वाहतुकीचा कहर

0
Navi Mumbai Traffic Chaos: ‘ट्रॅफिक पोलिसांचे रेट कार्ड?’ नागरिक संतप्त; ओव्हरलोड डम्पर, बेकायदा प्रवासी वाहतुकीचा कहर

Navi Mumbai Traffic Chaos: ‘ट्रॅफिक पोलिसांचे रेट कार्ड?’ नागरिक संतप्त; ओव्हरलोड डम्पर, बेकायदा प्रवासी वाहतुकीचा कहर

Navi Mumbai News: बेलापूर–CBD परिसरात वाहतूक कोंडी तीव्र. ओव्हरलोड डम्पर, बेकायदा व्हाईट नंबर वाहने आणि बनावट पोलिसांकडून वसुलीची चर्चा. नागरिकांनी प्रशासनाकडे 5 तातडीच्या मागण्या मांडल्या.

सायली मेमाणे

१४ नोव्हेंबर २०२५ :नवी मुंबईतील वाहतूक व्यवस्था कोलमडल्याची तक्रार नागरिकांनी अनेकदा केली आहे, पण गेल्या काही महिन्यांत ही समस्या अधिकच गंभीर बनली आहे. बेलापूर, सीबीडी आणि कोर्ट रोड परिसरात दररोज सकाळ-संध्याकाळ वाहनांची रांग लागते. वाहतुकीचा वेग अत्यंत कमी होतो आणि ही परिस्थिती आता नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणारी बनत आहे. या वाढत्या गोंधळामागे वाहतूक पोलिसांचेच ‘रेट कार्ड’ कार्यरत असल्याची चर्चा शहरभर पसरली असून, “पोलीस मस्त, प्रवासी त्रस्त” अशी नाराजी व्यक्त केली जात आहे.

शहरातील मोठा प्रश्न म्हणजे ओव्हरलोड डम्पर आणि टँकरची बेफाम धाव. नियमांप्रमाणे परवानगीपेक्षा कितीतरी पटीने अधिक माल भरून हे वाहन चालक शहरात विनाअडथळा फिरत आहेत. अनेक वाहनांकडे पीयूसी, फिटनेस, इन्शुरन्स यांसारखी अनिवार्य कागदपत्रेही नसतात. विशेष म्हणजे 15 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांनाही बिनदिक्कत प्रवेश मिळतो, ज्यामुळे रस्त्यांवरील सुरक्षितता धोक्यात येते. पाण्याचे टँकर, सिमेंट ट्रक आणि बांधकाम क्षेत्रातील वाहनांमुळे होणारी धूळही कोंडी आणि प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहे.

नवी मुंबईतील आणखी एक गंभीर समस्या म्हणजे व्हाईट नंबरवरील बेकायदा प्रवासी वाहतूक. खासगी वापरासाठी नोंदणीकृत असलेल्या वाहनांमधून बेलापूर, पनवेल, तुर्भे, सायन-कल्याण मार्गांवर मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची अवैध वाहतूक केली जाते. कॅमेरे नाहीत, फायर सेफ्टी नाही, महिला वाहक नाहीत आणि RTO च्या कोणत्याही अटींचे पालन नाही. तरीही ही वाहतूक उघडपणे सुरू आहे. नागरिकांच्या तक्रारीनुसार अशा वाहनांकडून महिन्याला “2,000 रुपये” इतकी फिक्स रक्कम वसूल केली जाते. एका डम्पर चालकाच्या म्हणण्यानुसार, “महिना 2,000 रुपये दिले की कुणीही पकडत नाही.” या वसुलीला नेमका कोणाचा पाठिंबा आहे, असा प्रश्न नागरिक सरळपणे विचारत आहेत.

याशिवाय, नानू घरे परिसरात काही व्यक्ती पोलीस असल्याचे भासवून वाहनधारकांकडून पैसे उकळत असल्याच्या तक्रारी आहेत. बनावट पोलिसांच्या वर्दळीकडे अधिकृत पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. मुंबई–पुणे मार्गावर आर्टिगा गाड्यांमधून अनधिकृत प्रवासी वाहतूक सुरू असून, या वाहनांचे चालक थेट एसटी थांब्यावर दादागिरी करतात. नियमित टॅक्सी आणि बस व्यवसायाला मोठा फटका बसतो आहे, सोबतच प्रवाशांच्या सुरक्षेलाही धोका वाढतो आहे.

या सर्व परिस्थितीमुळे बेलापूर आणि सीबीडी कोकण भवन परिसरात वाहतूक कोंडीचा कहर आहे. अनियमित पार्किंग, रिक्षांची गर्दी, स्कूल-बसचा दबाव आणि तुर्भे, तळोजा, वाशी, कोपरखैराणे भागात ट्रॅफिक पोलिसांचा अभाव यामुळे समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज हजारो प्रवासी दोन ते तीन किलोमीटरचा रस्ता पार करण्यासाठी तब्बल ३०-४० मिनिटे अडकून पडतात.

या दैनंदिन त्रासाला कंटाळलेल्या नागरिकांनी प्रशासनासमोर पाच महत्त्वाच्या मागण्या ठेवल्या आहेत: ओव्हरलोड वाहनांवर तातडीने कारवाई, बेकायदा व्हाईट नंबर वाहतूक बंद करणे, बनावट पोलिसांवर गुन्हे दाखल करणे, 15 वर्षांपेक्षा जुन्या व कागदपत्र नसलेल्या डम्पर जप्त करणे आणि बेलापूर व मुख्य चौकांमध्ये विशेष ट्रॅफिक स्क्वॉड नेमणे.

या समस्यांना नेमके कोण जबाबदार? आणि या सर्व अनियमित वाहतुकीला कोणाचे मौनाश्रय आहे? नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे या मुद्द्यांवर कोणती कारवाई करणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष आहे. वाहतुकीचा प्रश्न केवळ कोंडीचा नसून, जनजीवन आणि सुरक्षेचा आहे. त्यामुळे प्रशासनाची पुढील पावले निर्णायक ठरणार आहेत.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *