इथेनॉल मिश्रणाविरोधातील मोहीम ही पेट्रोल लॉबीचा दुष्प्रचार – नितीन गडकरी

0
इथेनॉल मिश्रणाविरोधातील मोहीम ही पेट्रोल लॉबीचा दुष्प्रचार – नितीन गडकरी

इथेनॉल मिश्रणाविरोधातील मोहीम ही पेट्रोल लॉबीचा दुष्प्रचार – नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इथेनॉल मिश्रण (E20) विरोधातील सोशल मीडिया मोहीम ही पैसे देऊन राबवलेला राजकीय दुष्प्रचार असल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांना ४५ हजार कोटींचा लाभ झाल्याचेही ते म्हणाले.

सायली मेमाणे

पुणे १२ सप्टेंबर २०२५ : इथेनॉल मिश्रणाच्या (E20) अनुषंगाने समाजमाध्यमांवर त्यांच्या विरोधात चालवली जाणारी मोहीम ही पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित असून पेट्रोल लॉबी यामागे सक्रिय असल्याचा आरोप केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी केला. सोसायटी ऑफ ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सच्या वार्षिक संमेलनात बोलताना गडकरी यांनी या विषयावर सविस्तर भाष्य केले.

त्यांनी सांगितले की, “ज्याप्रमाणे औद्योगिक क्षेत्रामध्ये एक ठराविक कार्यप्रणाली असते, त्याचप्रमाणे राजकारणातदेखील विशिष्ट यंत्रणा कार्यरत असते. समाजमाध्यमांवर माझ्या विरोधात जी मोहीम राबविली जात आहे, ती पैसे देऊन राबवली जात आहे. हा दुष्प्रचार माझे वैयक्तिक किंवा राजकीय नुकसान करण्याच्या उद्देशानेच केला जात आहे.”

गडकरी यांनी पुढे सांगितले की, इथेनॉल मिश्रणाच्या संदर्भात ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) यांसारख्या मान्यवर संस्थांनी आधीच आपले निष्कर्ष सार्वजनिक केले आहेत. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. त्यांनी स्पष्ट केले की, “इंधन आयातीसाठी भारताला प्रचंड प्रमाणात पैसा खर्च करावा लागतो. जर इथेनॉल मिश्रणामुळे पेट्रोलच्या आयातीत कपात झाली तर जो पैसा वाचेल, तो देशाच्या अर्थव्यवस्थेत इतर महत्त्वाच्या कामांसाठी वापरता येईल. यात वावगे काही नाही.”

शेतकऱ्यांना यामधून थेट फायदा होत असल्याचेही गडकरी यांनी नमूद केले. मका पिकापासून इथेनॉल निर्मितीमुळे देशभरातील शेतकऱ्यांना तब्बल ४५ हजार कोटी रुपयांचा फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे शेतकऱ्यांना नव्या बाजारपेठा उपलब्ध झाल्या असून, ग्रामीण भागातील उत्पन्न वाढीस चालना मिळाली आहे.

त्यांनी समाजमाध्यमांवर होत असलेल्या विरोधामागील लॉबीवरही बोट ठेवले. “इथेनॉल मिश्रणाला विरोध करण्यासाठी जी मोहीम सुरू आहे, ती पेट्रोल लॉबीमुळेच आहे. ही लॉबी आर्थिकदृष्ट्या बलाढ्य आहे आणि स्वतःचे हितसंबंध जपण्यासाठी अशा पद्धतीचे दुष्प्रचार राबविते. प्रत्येक क्षेत्रामध्ये अशा लॉबी कार्यरत असतात. वाहन उद्योगावर वाईट परिणाम व्हावा, हा हेतू या दुष्प्रचारामागे आहे,” असे गडकरी यांनी ठामपणे म्हटले.

गडकरींच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. इथेनॉल मिश्रणामुळे प्रदूषण कमी होणार, परदेशी इंधनावरील अवलंबित्व घटणार आणि देशांतर्गत शेती उत्पादनांना नवी बाजारपेठ उपलब्ध होणार हे वास्तव असताना विरोधी लॉबीने पसरवलेल्या दुष्प्रचाराचा प्रतिकार होणे आवश्यक असल्याचे मत उद्योग व कृषी क्षेत्रातून व्यक्त केले जात आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *