Palghar News: चिकन लॉलीपॉपच्या हट्टावरून आईकडून मुलाचा मृत्यू, मुलगी गंभीर जखमी

0
Palghar News: चिकन लॉलीपॉपच्या हट्टावरून आईकडून मुलाचा मृत्यू, मुलगी गंभीर जखमी

Palghar News: चिकन लॉलीपॉपच्या हट्टावरून आईकडून मुलाचा मृत्यू, मुलगी गंभीर जखमी

पालघरमधील धनसार काशिपाडा येथे नवरात्रौत्सवात मुलांच्या हट्टावरून आईनेच मुलांना बेदम मारहाण केली. यात सात वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून मुलगी गंभीर जखमी झाली आहे. परिसरात हळहळ व्यक्त.

सायली मेमाणे

पुणे २९ सप्टेंबर २०२५ : पालघर तालुक्यातील धनसार काशिपाडा परिसरात घडलेली एक घटना सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. नवरात्रौत्सवात उपवास करणाऱ्या आईने मुलांच्या हट्टामुळे संतापून दोन्ही मुलांना लाटण्याने बेदम मारहाण केली. या घटनेत सात वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून त्याची मोठी बहीण गंभीर जखमी झाली आहे. आईच्या हातूनच मुलांच्या जिवाला धोका निर्माण झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत बालकाचे नाव चिन्मय गणेश घुमडे असे असून त्याची आई पल्लवी घुमडे हिला पोलिसांनी अटक केली आहे. पल्लवी आणि तिचा पती गणेश घुमडे हे मूळ भाईंदरचे रहिवासी आहेत. गणेश रिक्षा चालवून उदरनिर्वाह करत होता. पती-पत्नीमध्ये नेहमीच वाद व्हायचे, त्यामुळे पाच महिन्यांपूर्वी पल्लवी वेगळी राहू लागली. ती आपल्या बहिणीकडे राहून एका कंपनीत काम करत होती. या काळात ती नवरात्रौत्सवाचे उपवास करत होती.

घटनेच्या दिवशी मुलांनी चिकन लॉलीपॉप खाण्याचा हट्ट धरला. मात्र, उपवासाच्या पार्श्वभूमीवर हा हट्ट ऐकून पल्लवी संतापली. स्वयंपाकघरातील लाटण उचलून तिने दोन्ही मुलांना बेदम मारहाण केली. यात सात वर्षीय चिन्मयच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तो जागीच मृत झाला. त्याची बहीण मात्र गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, परिसरातील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलं हट्ट केल्यावर आई-वडील दोघेही नेहमी त्यांना मारहाण करायचे. यामुळे मुलांच्या अंगावर आधीपासूनच खुणा आढळल्या आहेत. घटनेच्या दिवशीही किरकोळ कारणावरून इतका मोठा प्रकार घडला.

घटना उघड होताच पालघर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पल्लवीला ताब्यात घेतले. तिच्यावर मुलाच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. एका आईच्या हातून घडलेल्या या निर्दयी कृत्यामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून नागरिकांनी याविरोधात रोष व्यक्त केला आहे.

आई-मुलांमधील नाते हे प्रेम, काळजी आणि आपुलकीचे मानले जाते. मात्र, पालघरमधील या घटनेने समाजाला हादरवून सोडले आहे. केवळ हट्टावरून मुलाचा जीव गेला आणि एका निरागस मुलीच्या जिवाला धोका निर्माण झाला. नवरात्रौत्सवासारख्या धार्मिक वातावरणात अशा प्रकारची घटना घडल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *