PCMC Crime: गुन्हेगारांमध्ये खळबळ! पिंपरी-चिंचवड पोलिस अ‍ॅक्शन मोडवर; 47 सराईतांवर तडीपारीची कारवाई

0
PCMC Crime: गुन्हेगारांमध्ये खळबळ! पिंपरी-चिंचवड पोलिस अ‍ॅक्शन मोडवर; 47 सराईतांवर तडीपारीची कारवाई

PCMC Crime: गुन्हेगारांमध्ये खळबळ! पिंपरी-चिंचवड पोलिस अ‍ॅक्शन मोडवर; 47 सराईतांवर तडीपारीची कारवाई


पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारीविरोधात मोठी कारवाई. 47 सराईत गुन्हेगार तडीपार, 2 जण एमपीडीएअंतर्गत स्थानबद्ध; पोलिस आयुक्तांचा कडक इशारा.


पुणे ०८ जानेवारी २०२६ : पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशानुसार शहर पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, गुन्हेगारांमध्ये खळबळ उडवणारी मोठी कारवाई करण्यात आली आहे. जानेवारी 2026 या एकाच महिन्यात पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या चारही परिमंडळांतर्गत तब्बल 47 सराईत गुन्हेगारांवर तडीपार आणि हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. यासोबतच दोन कुख्यात गुन्हेगारांना ‘एमपीडीए’ कायद्यान्वये एका वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.

ही कारवाई शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे, या उद्देशाने करण्यात आली आहे. खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोड्याची तयारी, खंडणीसाठी अपहरण, गंभीर दुखापत, महिलांवरील अत्याचार, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे तसेच तडीपार आदेशाचा भंग अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये सक्रिय असलेल्या सराईत गुन्हेगारांवर ही प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.

एमपीडीए कायद्यान्वये चाकण उत्तर आणि उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सक्रिय असलेले रजीत लक्ष्मण येरकर (वय 19, रा. नाणेकरवाडी, ता. खेड) आणि रामदास मारुती साळुंके (वय 37, रा. आंबेठाण, ता. खेड) या दोन गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. त्यांना अनुक्रमे येरवडा आणि नागपूर मध्यवर्ती कारागृहात एका वर्षासाठी ठेवण्यात आले असून, या कारवाईमुळे गुन्हेगारी टोळ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तडीपार कारवाईअंतर्गत परिमंडळ 1 मध्ये 10, परिमंडळ 2 मध्ये 9, परिमंडळ 3 मध्ये 17 आणि परिमंडळ 4 मध्ये 11 अशा एकूण 47 सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्हा, पिंपरी-चिंचवड शहर तसेच काही प्रकरणांमध्ये रायगड जिल्ह्याच्या हद्दीतून ठरावीक कालावधीसाठी बाहेर काढण्यात आले आहे. तडीपार करण्यात आलेले हे गुन्हेगार 20 ते 50 वयोगटातील असून, त्यांच्या विरोधात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

पोलिस आयुक्तालयाच्या या कठोर भूमिकेमुळे शहरातील गुन्हेगारीत लक्षणीय घट झाल्याचे चित्र दिसून येत आहे. भविष्यातही अशाच प्रकारची ठोस आणि परिणामकारक प्रतिबंधक कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तडीपार केलेले गुन्हेगार पुन्हा हद्दीत आढळल्यास नागरिकांनी तात्काळ 112 क्रमांकावर किंवा जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत चार परिमंडळांतर्गत एकूण 24 पोलिस ठाणे कार्यरत असून, या हद्दीतील 400 हून अधिक गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलिसांची बारकाईने नजर आहे. सराईत गुन्हेगारांना गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यासाठी आणि शहरात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी पोलिसांकडून कठोर धोरण राबवले जात असल्याचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी स्पष्ट केले आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed