PCMC Election: प्रभाग 19 आणि 30 मध्ये आरक्षणात मोठा बदल; OBC आणि सर्वसाधारण महिला आरक्षणावर परिणाम
प्रभाग 19 आणि 30 मध्ये आरक्षणात मोठा बदल; OBC आणि सर्वसाधारण महिला आरक्षणावर परिणाम
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत प्रभाग 19 आणि 30 मधील चार जागांच्या आरक्षणात निवडणूक आयोगाने दुरुस्ती केली. OBC आणि सर्वसाधारण महिला आरक्षणावर थेट परिणाम; नागरिकांना हरकत नोंदवण्याची संधी.
सायली मेमाणे
पुणे १८ नोव्हेंबर २०२५ : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी झालेल्या आरक्षण सोडतीनंतर राज्य निवडणूक आयोगाने दोन प्रभागांतील चार जागांच्या आरक्षणात बदल केला असून या निर्णयामुळे OBC आणि सर्वसाधारण महिला आरक्षणाच्या गणितात मोठे बदल झाले आहेत. ११ नोव्हेंबरला झालेल्या आरक्षण सोडतीत झालेल्या त्रुटींचा आढावा घेतल्यानंतर आयोगाने प्रभाग क्रमांक १९ आणि ३० मधील काही जागांवर दुरुस्ती केली आहे.
प्रभाग क्रमांक ३० मध्ये ‘क’ जागा पूर्वी OBC प्रवर्गासाठी होती. नियमांनुसार, जर एखाद्या प्रभागात SC किंवा ST प्रवर्गाची जागा महिलांसाठी राखीव नसेल, तर त्या प्रभागातील OBC जागा महिलांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. ही तरतूद प्रभाग ३० मध्ये लागू करण्यात आली नव्हती. त्यामुळे आता ‘क’ जागा दुरुस्त करून OBC महिलांसाठी राखीव करण्यात आली आहे. याच प्रभागातील ‘ड’ जागा जी पूर्वी सर्वसाधारण महिला म्हणून घोषित झाली होती, ती दुरुस्तीमुळे आता सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुली झाली आहे.
या उलट फेरबदलाचा परिणाम प्रभाग १९ वरही दिसून आला आहे. कारण OBC महिला आरक्षण ३० मध्ये लागू झाल्याने सोडतीनुसार प्रभाग १९ मधील ‘ब’ जागा जी पूर्वी OBC महिलांसाठी होती, तिचे महिला आरक्षण रद्द करण्यात आले असून ती आता फक्त OBC प्रवर्गासाठी राखीव राहणार आहे. तर या बदलांची सांगड घालत प्रभाग १९ मधील ‘क’ जागा आता सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाली आहे. या बदलांमुळे दोन्ही प्रभागांतून इच्छुक उमेदवारांच्या रणनीतीवर लक्षणीय परिणाम होण्याची शक्यता आहे.
या दुरुस्तीविषयी पिंपरी-चिंचवड निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पवार यांनी सांगितले की, आरक्षण सोडतीनंतर राज्य निवडणूक आयोगाने नियमानुसार योग्य ते बदल करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार दुरुस्ती करून आरक्षणाचे सुधारित स्वरूप प्रसिद्ध केले आहे. या कारवाईमुळे काहींचे राजकीय गणित बदलले असले तरी आरक्षणातील नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रभाग १९ आणि प्रभाग ३० मधील नव्या आरक्षणामुळे काही उमेदवारांचे राजकीय समीकरण बदलणार असून अनेकांनी आपल्या तक्रारी आणि असंतोषाची नोंद घ्यायला सुरुवात केली आहे. बदलांच्या अधिकृत यादीनुसार प्रभाग १९ मधील जागांचे नवीन चित्र असे आहे: ‘अ’ अनुसूचित जाती महिला, ‘ब’ OBC, ‘क’ सर्वसाधारण महिला आणि ‘ड’ सर्वसाधारण. प्रभाग ३० मध्ये ‘अ’ अनुसूचित जाती, ‘ब’ अनुसूचित जमाती महिला, ‘क’ OBC महिला आणि ‘ड’ सर्वसाधारण प्रवर्ग अशी नवीन आरक्षण रचना लागू झाली आहे.
नागरिकांसाठी या आरक्षण बदलांवर हरकत नोंदवण्याची सोयही ठेवण्यात आली आहे. १७ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत नागरिकांना आपली हरकत निवडणूक विभागाकडे नोंदवता येणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत राजकीय हालचाली आणि तक्रारींची संख्या वाढण्याची शक्यता आहे आणि अंतिम आरक्षण यादी येईपर्यंत निवडणूक राजकारणात चुरस कायम राहणार आहे.