Pimpri Chinchwad Election: राहुल कलाटेंच्या भाजप प्रवेशावरून गोंधळ; स्थानिक नेत्यांचा तीव्र विरोध, निर्णय लांबणीवर
Pimpri Chinchwad Election: राहुल कलाटेंच्या भाजप प्रवेशावरून गोंधळ; स्थानिक नेत्यांचा तीव्र विरोध, निर्णय लांबणीवर
पिंपरी-चिंचवडमध्ये राहुल कलाटेंच्या भाजप प्रवेशावरून पक्षात अस्वस्थता. स्थानिक नेते व कार्यकर्त्यांचा कडाडून विरोध, भाजप श्रेष्ठींसमोर मोठे आव्हान.
पुणे १९ डिसेंबर २०२५ : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला असतानाच, या संभाव्य प्रवेशामुळे भाजपच्या गोटात मात्र मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेषतः चिंचवड परिसरातील स्थानिक भाजप नेते, पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांनी या प्रवेशाला उघड विरोध दर्शवल्याने पक्ष नेतृत्वाची डोकेदुखी वाढली आहे.
राहुल कलाटे हे गेल्या काही वर्षांपासून चिंचवड मतदारसंघातील एक प्रभावी राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, त्यानंतर अश्विनी जगताप आणि नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार शंकर जगताप यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यामुळे भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना तीव्र आहे. “ज्यांच्याविरोधात आम्ही वर्षानुवर्षे संघर्ष केला, त्यांचाच प्रचार आता कसा करायचा?” असा थेट सवाल स्थानिक इच्छुकांनी उपस्थित केला आहे.
प्रभाग क्रमांक २५ मधील अनेक भाजप कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, जर राहुल कलाटेंना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला, तर आगामी महापालिका निवडणुकीत पक्षातील जुने, निष्ठावंत कार्यकर्ते डावलले जातील. यामुळे पक्षसंघटनात्मक पातळीवर मोठी फूट पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही कार्यकर्त्यांनी तर “कलाटे आले तर आम्ही वेगळा विचार करू” असा थेट इशाराही दिल्याची चर्चा आहे.
या सगळ्या घडामोडींमुळे भाजपच्या स्थानिक नेतृत्वातही मतभेद असल्याचे संकेत मिळत आहेत. आमदार शंकर जगताप आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचाही या प्रवेशाबाबत अनुकूल सूर नसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. दुसरीकडे, राहुल कलाटे मात्र भाजप प्रवेशाबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना एक-दोन दिवसांत अंतिम निर्णय घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. मात्र, ते भाजपमध्येच प्रवेश करतील की महायुतीतील अन्य कोणत्या पक्षाचा पर्याय निवडतील, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
पिंपरी-चिंचवडसारख्या महत्त्वाच्या महानगरपालिकेवर सत्ता मिळवणे हे भाजपसाठी प्रतिष्ठेचे मानले जाते. त्यामुळे एका बाजूला मोठ्या चेहऱ्याला पक्षात घेऊन राजकीय ताकद वाढवायची की दुसऱ्या बाजूला स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना जपायच्या, असा कठीण पेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसमोर उभा राहिला आहे. राहुल कलाटेंचा प्रवेश तातडीने न होता लांबणीवर पडल्याने सध्या संपूर्ण शहरात ‘वेट अँड वॉच’ची भूमिका पाहायला मिळत आहे.
आगामी काही दिवसांत भाजप नेतृत्व कोणता निर्णय घेते, यावर पिंपरी-चिंचवडमधील राजकीय समीकरणे ठरणार आहेत. संवादाच्या माध्यमातून हा वाद मिटवला जाणार की या प्रकरणामुळे पक्षांतर्गत फूट अधिकच वाढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information