PMC Election 2026: पुण्यात 12 हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त; महापालिका मतदानासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

0
PMC Election 2026: पुण्यात 12 हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त; महापालिका मतदानासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

PMC Election 2026: पुण्यात 12 हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त; महापालिका मतदानासाठी पोलीस यंत्रणा सज्ज


पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होत असून, शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी 12 हजारांहून अधिक पोलिस, होमगार्ड आणि SRPF तैनात करण्यात आले आहेत.

पुणे १३ जानेवारी २०२६ : पुणे शहरात होणाऱ्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन पूर्णतः सज्ज झाले असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलिसांनी तगडा बंदोबस्त आखला आहे. गुरुवारी, 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरात तब्बल 12 हजारांहून अधिक पोलिस अधिकारी आणि अंमलदारांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रियेच्या दहा दिवसांच्या प्रचाराची रणधुमाळी आता थांबली असून, शांततेत मतदान पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पुणे पोलिसांनी चारस्तरीय सुरक्षा व्यवस्था उभी केली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिस अंमलदार, वरिष्ठ निरीक्षक, सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्त यांच्या देखरेखीखाली सुरक्षा तैनात असणार आहे. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवले जाणार असून, या ठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे. शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिस यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे.

पुणे शहरात एकूण 3 हजार 983 मतदान केंद्रे असून, ही केंद्रे 913 इमारतींमध्ये आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर एक कर्मचारी आणि होमगार्ड तैनात असणार असून, त्यासोबत स्थानिक पोलिसांचा स्वतंत्र बंदोबस्त राहणार आहे. प्रत्येक मतदान इमारतीत दोन पोलिस अंमलदार नियुक्त करण्यात आले आहेत. मतदानाच्या दिवशी प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत सतत पेट्रोलिंग करण्यात येणार असून, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.

शहरात एकूण 90 मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या ठिकाणी एक वरिष्ठ अधिकारी आणि पाच पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, आठ क्यूआरटी (Quick Response Team) पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी सहा अतिवरिष्ठ पोलिस अधिकारी आणि प्रत्येकी 50 पोलिस अंमलदारांचे स्ट्रायकिंग फोर्स देखील तैनात करण्यात आले आहेत.

या निवडणुकीसाठी पोलिस आयुक्त आणि सहआयुक्त यांच्या थेट देखरेखीखाली चार अपर पोलिस आयुक्त, 14 पोलिस उपायुक्त, सुमारे 7 हजार पोलिस अधिकारी व अंमलदार, 3 हजार होमगार्ड आणि चार SRPF कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय, चारचाकी वाहनांद्वारे सुमारे 500 पोलिस कर्मचारी शहरभर पेट्रोलिंग करणार आहेत. संपूर्ण यंत्रणा 454 झोनमध्ये विभागण्यात आली असून, प्रत्येक झोनमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

मतदान प्रक्रिया शांततेत, निर्भय वातावरणात आणि कोणत्याही अडथळ्यांशिवाय पार पाडणे हेच पुणे पोलिसांचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा आणि कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनही पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *