पुणे मनपात अपात्र डॉक्टरांच्या नियुक्त्यांचा आरोप सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत जगधने यांचा प्रशासनाला इशारा

0
पुणे मनपात अपात्र डॉक्टरांच्या नियुक्त्यांचा आरोप; सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत जगधने यांचा प्रशासनाला इशारा

पुणे मनपात अपात्र डॉक्टरांच्या नियुक्त्यांचा आरोप; सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत जगधने यांचा प्रशासनाला इशारा

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात MBBS ऐवजी BAMS डॉक्टरांची नियुक्ती केल्याचा आरोप. सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत जगधने यांचा 15 दिवसांत कारवाईचा अल्टिमेटम.

पुणे ०७ मार्च २०२६ : पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी या महत्त्वाच्या पदांवर अपात्र डॉक्टरांची नियुक्ती केल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणावर सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत भास्कर जगधने यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. त्यांच्या मते, नियमांचे उल्लंघन करून करण्यात आलेल्या या नियुक्त्या पुणेकरांच्या आरोग्याशी धोकादायक खेळ करणाऱ्या आहेत.

पुणे महानगरपालिकेच्या २१ जानेवारी २००२ रोजी जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत धोरणानुसार क्षेत्रीय कार्यालयातील वैद्यकीय अधिकारी पदासाठी MBBS पदवी अनिवार्य आहे. मात्र सध्या या पदांवर कार्यरत असलेल्या १५ अधिकाऱ्यांपैकी ३ जणांकडे केवळ B.A.M.S. पदवी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या नियुक्त्यांमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

विशेष म्हणजे आरोग्य विभागाने ११ एप्रिल २०२५ रोजी प्रसिद्ध केलेल्या सेवाजेष्ठता यादीत डॉ. दिनेश बेंडे, डॉ. गोपाळ उज्ववनकर आणि डॉ. गणेश डमाळे यांना संबंधित पदासाठी अपात्र ठरवण्यात आले होते. तरीदेखील हे डॉक्टर अद्याप त्याच पदांवर कार्यरत असल्याचे सांगितले जात आहे. प्रशासनाने स्वतः अपात्र ठरवलेल्या अधिकाऱ्यांना त्या पदावर कायम ठेवणे हे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम ४५ आणि ५१ चे उल्लंघन असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणात आणखी एक गंभीर मुद्दा पुढे आला आहे. तत्कालीन अतिरिक्त आयुक्तांनी या पदासाठी केवळ MBBS डॉक्टरच पात्र असावेत असे स्पष्ट धोरण निश्चित केले होते. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी एक तांत्रिक अहवाल तयार करून दिला होता. मात्र हा अहवाल आरोग्य प्रमुखांकडून जाणीवपूर्वक दडपण्यात आल्याची चर्चा पालिकेच्या वर्तुळात सुरू आहे. अपात्र डॉक्टरांना संरक्षण देण्यासाठी हा महत्त्वाचा अहवाल गायब करण्यात आल्याचा संशय सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत जगधने यांनी व्यक्त केला आहे.

क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी हे पद शहराच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांच्या काळात तांत्रिक निर्णय घेण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर असते. MBBS डॉक्टरांना एपिडेमियोलॉजी अर्थात साथरोगशास्त्राचे सखोल प्रशिक्षण दिले जाते. मात्र BAMS डॉक्टरांकडे हे प्रशिक्षण नसल्यामुळे चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता वाढते आणि त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो, असा आरोप करण्यात आला आहे.

याशिवाय जन्म आणि मृत्यूच्या प्रमाणपत्रांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या कागदपत्रांवर अपात्र व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या असल्यास भविष्यात कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात, असेही जगधने यांनी नमूद केले आहे. त्यामुळे हा केवळ प्रशासनिक प्रश्न नसून तो थेट नागरिकांच्या सुरक्षिततेशी आणि कायदेशीर प्रक्रियेशी संबंधित असल्याचे ते म्हणाले.

या सर्व पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत जगधने यांनी पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांना निवेदन देत १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. या कालावधीत अपात्र डॉक्टरांच्या नियुक्त्या रद्द करून त्या पदांवर पात्र MBBS डॉक्टरांची नियुक्ती करावी, तसेच संबंधित अहवाल दडपणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री कार्यालय, नगरविकास विभाग आणि पुणे महानगरपालिका आयुक्त यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. जर १५ दिवसांत ठोस कारवाई झाली नाही तर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशाराही जगधने यांनी दिला आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय घडते आणि प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे आता पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed