PMC Result 2026: पुणेकरांचा धक्का! फायरब्रँड नेत्यांचा बँड वाजला; तात्या, भाऊ, ताई पडले
PMC Result 2026: पुणेकरांचा धक्का! फायरब्रँड नेत्यांचा बँड वाजला; तात्या, भाऊ, ताई पडले
PMC Election Result 2026 मध्ये पुण्यात भाजपच्या लाटेत अनेक फायरब्रँड नेते पराभूत झाले. धंगेकर, वसंत मोरे, रुपाली ठोंबरे यांच्यासह मातब्बर नेत्यांचे धक्कादायक पराभव चर्चेत.
पुणे १७ जानेवारी २०२६ : पुणे महानगरपालिका निवडणूक निकाल 2026 मध्ये भाजपने घवघवीत विजय मिळवत संपूर्ण शहरावर वर्चस्व प्रस्थापित केले असले, तरी या निकालातील सर्वात मोठा धक्का म्हणजे अनेक फायरब्रँड आणि मातब्बर नेत्यांचा पराभव. पुणेकरांनी यंदा प्रस्थापित नेत्यांनाच धक्का देत “नाव नव्हे तर काम” या भूमिकेवर मतदान केल्याचे स्पष्ट झाले आहे. 165 जागांपैकी भाजपने तब्बल 90 जागा जिंकत सत्ता हस्तगत केली, तर विरोधकांची अक्षरशः दाणादाण उडाली.
या निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेत राहिलेला पराभव म्हणजे रविंद्र धंगेकर कुटुंबाचा. कसबा पेठेतील पोटनिवडणुकीत भाजपचा गड सर करत राजकीय चर्चेत आलेले रविंद्र धंगेकर यांना याआधीच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. मनपा निवडणुकीआधी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला, मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर आणि मुलगा प्रणव धंगेकर या दोघांनाही पराभव स्वीकारावा लागला. विशेष म्हणजे जेलमधून निवडणूक लढवणाऱ्या सोनाली आंदेकर यांनी प्रतिभा धंगेकर यांचा पराभव करत मोठा धक्का दिला, तर भाजपचे गणेश बीडकर यांनी प्रणव धंगेकर यांना पराभूत केले.
ठाकरेंचे फायरब्रँड नेते वसंत मोरे यांचा पराभवही पुणे राजकारणासाठी धक्कादायक ठरला. वसंत मोरे यांनी यंदा आपल्या मुलाला रुपेश मोरे यांना राजकारणात उतरवले होते. कात्रज परिसरात संजय राऊत यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी प्रचार करूनही मतदारांनी मोरे पिता-पुत्रांना नाकारले. प्रभाग क्रमांक 40 मध्ये भाजपच्या रंजना टिळेकर यांनी रुपेश मोरे यांचा पराभव केला, तर स्वतः वसंत मोरे यांना प्रभाग क्रमांक 38 मधून 1011 मतांनी पराभवाचा सामना करावा लागला.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या फायरब्रँड नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांचाही यंदा पराभव झाला. त्यांनी दोन प्रभागांतून निवडणूक लढवली होती, मात्र दोन्ही ठिकाणी मतदारांनी त्यांना नाकारले. मतमोजणीदरम्यान ईव्हीएम संदर्भात आक्षेप घेण्यात आले, काही काळ मतमोजणी थांबली, पण अंतिम निकालाने पराभवावर शिक्कामोर्तब केले. हा पराभव राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
या निवडणुकीत केवळ उमेदवारच नव्हे तर शहराध्यक्षांनाही मतदारांनी घरी बसवले. मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजय मोरे आणि अजित पवार गटाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांना पराभव स्वीकारावा लागला. याउलट आंदेकर कुटुंबातील लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांनी तुरुंगातून निवडणूक लढवत विजय मिळवला, ही बाब पुणे राजकारणात चर्चेचा विषय ठरली. एकूणच PMC Election Result 2026 ने पुण्यातील राजकीय समीकरणे बदलून टाकली असून, मतदारांनी फायरब्रँड प्रतिमेपेक्षा स्थैर्य आणि संघटनशक्तीला पसंती दिल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information