PMPML News Pune : पीएमपीएलचा कारभार सुधारा; 690 बसेस कुठे आहेत? माहिती लपवल्याचा गंभीर आरोप

0
PMPML News Pune : पीएमपीएलचा कारभार सुधारा; 690 बसेस कुठे आहेत? माहिती लपवल्याचा गंभीर आरोप

PMPML News Pune : पीएमपीएलचा कारभार सुधारा; 690 बसेस कुठे आहेत? माहिती लपवल्याचा गंभीर आरोप


PMPML Pune News: लाभदायक मार्गांवर कंत्राटी बसेस, महामंडळाचे नुकसान आणि 690 बसेस गायब असल्याचा आरोप. पीएमपीएमएलच्या कारभारावर माजी पदाधिकाऱ्यांचे गंभीर प्रश्न.

पुणे ०७ जानेवारी २०२६ : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांसाठी सार्वजनिक वाहतुकीचा कणा मानले जाणारे पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) हळूहळू आर्थिक तुटीचे केंद्र बनत चालले असल्याचा गंभीर आरोप माजी पदाधिकाऱ्यांनी केला आहे. पीएमपीएमएलच्या अपयशी कारभाराचा थेट आर्थिक भार नागरिकांच्या खिशातून वसूल केला जात असून, वेळेत ठोस सुधारणा झाल्या नाहीत तर ही लूट थांबणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.

पुणे महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी अतिरिक्त आयुक्त तसेच पीएमपीएमएलचे प्रभारी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज बी.पी. यांना निवेदन देत महामंडळाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. पीएमपीएमएलच्या वाढत्या तोट्याबाबत सखोल चौकशी करून तातडीने सुधारात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महसूल देणाऱ्या प्रमुख मार्गांवर महामंडळाच्या स्वतःच्या बसेसऐवजी मोठ्या प्रमाणात खासगी कंत्राटदारांच्या बसेस चालवल्या जात आहेत. यामुळे पीएमपीएमएलला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत असून, खासगी ठेकेदारांना मात्र थेट फायदा होत आहे. कात्रज–निगडी, वारजे–लोणीकंद, मनपा–राजगुरुनगर, मनपा–तळेगाव तसेच विविध डेपो ते आळंदी या मार्गांवर कंत्राटी बसेसचे प्रमाण अधिक असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

कंत्राटी बसेसवरील चालकांकडून वेळापत्रकाचे उल्लंघन, बस थांब्यावर न थांबवणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन तसेच काही चालक मद्यपान करून ड्युटीवर येत असल्याचे गंभीर आरोपही करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येक मार्गावर चेकर नेमणे आणि चालक ज्या डेपोमधून बस घेतात तेथे नियमित तपासणी करणे अत्यावश्यक असल्याचे माजी पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

कंत्राटी व्यवस्थेत काम करणाऱ्या चालक आणि कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे वेतन दिले जात नसल्याने कामात हलगर्जीपणा वाढत असल्याचा दावाही करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन, पीएफ कपात आणि ती रक्कम राज्य सरकारकडे वेळेत जमा होते की नाही, याबाबत कंत्राटदारांकडून लेखी अहवाल मागवावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

महामंडळाच्या मालकीच्या सुमारे 690 बसेस सध्या कुठे आहेत, त्यापैकी किती बसेस रस्त्यावर धावत आहेत आणि किती बंद आहेत, याची स्पष्ट माहिती प्रशासनाकडून दिली जात नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. स्पेअर पार्ट्स आणि ऑइल वेळेवर न मिळाल्यामुळे अनेक बसेस बंद असल्याचा दावा करीत, सर्व डेपो व्यवस्थापकांची बैठक घेऊन चालू आणि बंद बसेसची माहिती नागरिकांसाठी सार्वजनिक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय, कंत्राटी बस व्यवस्थेत नेमका किती महसूल मिळतो आणि किती बुडतो, हे पीएमपीएमएललाच स्पष्ट नसल्याचा आरोप करीत, प्रत्येक कंत्राटी बसमध्ये महामंडळाचा कंडक्टर असणे बंधनकारक करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. रखवालदारांच्या कंत्राटातही मोठ्या प्रमाणात अनियमितता असून अपेक्षित मनुष्यबळाच्या तुलनेत 35 ते 40 टक्के कर्मचारी कमी असल्याचा दावाही करण्यात आला आहे.

पीएमपीएमएलची स्थापना ज्या उद्देशाने झाली, तो उद्देशच बाजूला पडल्याचा ठपका ठेवत, ‘पीएमपी वाचवायची असेल तर तिचे संचलन मेट्रोकडे द्यावे,’ अशी ठाम भूमिका माजी पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्या आहेत.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *