पृथ्वी शॉ वाद: पुण्यातील सराव सामन्यात मुशीर खानवर बॅट उगारण्याचा प्रकरण
पृथ्वी शॉ वाद: पुण्यातील सराव सामन्यात मुशीर खानवर बॅट उगारण्याचा प्रकरण
पुण्यातील रणजी ट्रॉफी 2025-26 च्या सराव सामन्यात पृथ्वी शॉने 181 धावा केल्या, परंतु मुंबईच्या खेळाडू मुशीर खानवर बॅट उगारण्याचा प्रयत्न करत मोठा वाद निर्माण केला. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली असून शॉच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सायली मेमाणे
पुणे ९ ऑक्टोबर २०२५ : पुण्यातील रणजी ट्रॉफी 2025-26 हंगामाच्या सराव सामन्यात पृथ्वी शॉ पुन्हा एकदा वादात सापडला आहे. एमसीए स्टेडियम, पुणे येथे महाराष्ट्र आणि मुंबई या संघांमध्ये सुरू असलेल्या सराव सामन्यात पृथ्वी शॉने १८१ धावांची दमदार खेळी केली, परंतु सामन्यातील त्याच्या वर्तनामुळे मोठा वाद निर्माण झाला.
मुंबई संघाच्या युवा खेळाडू मुशीर खानने शॉला बाद केले, त्यानंतर केलेल्या सेलिब्रेशनमुळे शॉचे संताप उफाळून आला. पॅव्हेलियनकडे परतत असताना पृथ्वीने मुशीर खानकडे धाव घेत बॅट उगारण्याचा प्रयत्न केला. यामुळे मैदानात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मुंबई संघाचे कर्णधार सिद्धेश लाड आणि अंपायर्स हस्तक्षेप करून वाद थांबवण्याचा प्रयत्न करत होते, मात्र शॉचा राग शांत झाला नाही.
शॉच्या या वर्तनामुळे क्रिकेट वर्तुळात मोठा गदारोळ उभा राहिला आहे. एकेकाळी भारतीय अंडर-19 विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार आणि आक्रमक फलंदाज म्हणून ओळखले जाणारा पृथ्वी शॉ, या घटनेमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. शॉने सलामीचा फलंदाज अर्शिन कुलकर्णीसोबत ३०५ धावांची विक्रमी भागीदारी केली, परंतु १८१ धावांवर बाद होताच मैदानातील वादग्रस्त वर्तन उघड झाले.
पृथ्वी शॉची प्रतिमा गेल्या काही काळात धडकल्याचे दिसून आले आहे. मुंबई संघात स्थान मिळवण्यात अपयश, मैदानाबाहेर वादग्रस्त वागणे आणि काही अपुष्ट आरोप यामुळे त्याचे नाव चर्चेत आले. त्यामुळे शॉने मुंबई संघाऐवजी महाराष्ट्र संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्याचे म्हणणे होते की, महाराष्ट्र संघात खेळणे त्याच्या कारकिर्दीसाठी फायदेशीर ठरेल.
या घटनेनंतर बीसीसीआयच्या कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे. क्रिकेट वर्तुळातील तज्ज्ञ या प्रकरणाकडे लक्ष ठेवून आहेत, आणि भविष्यात पृथ्वी शॉवर संभाव्य शिक्षा होऊ शकते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे ही घटना सर्वांच्या लक्षात आली असून, युवा क्रिकेटपटूंच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शॉच्या या वर्तनामुळे मैदानातील खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांमध्ये मिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी त्याच्या आक्रमक फलंदाजीचे कौतुक केले, तर काहींनी मैदानातील वादग्रस्त वर्तनामुळे गंभीर चिंता व्यक्त केली. त्यामुळे रणजी ट्रॉफीच्या हंगामापूर्वीच पुण्यातील सराव सामन्याने चर्चा निर्माण केली आहे.