पुणे महापालिकेची अनंत चतुर्दशी विसर्जनासाठी भव्य आरोग्य तयारी – ३०० अधिकारी सज्ज
पुणे महापालिकेची अनंत चतुर्दशी विसर्जनासाठी भव्य आरोग्य तयारी – ३०० अधिकारी सज्ज
अनंत चतुर्दशी विसर्जनासाठी पुणे महापालिकेने १५ वैद्यकीय पथके, ३०० अधिकारी, ३० रुग्णवाहिका आणि आपत्कालीन आरोग्य सुविधा सज्ज ठेवल्या आहेत. बेलबाग चौकातील आरोग्य शिबिराचा २,००० नागरिकांनी लाभ घेतला.
सायली मेमाणे
पुणे ५ सप्टेंबर २०२५ : पुण्यातील जल्लोषमय वातावरणात सुरू असलेल्या गणेशोत्सवाचा समारोप यंदा अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच शनिवार, ६ सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवरून निघणाऱ्या विसर्जन मिरवणुकांना लाखो भाविक उपस्थित राहणार असल्याने पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने विशेष तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी भव्य आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
महापालिकेकडून यासाठी १५ वैद्यकीय पथके, ८० वैद्यकीय अधिकारी आणि जवळपास २०० आरोग्य कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय गर्दीच्या ठिकाणी स्वतंत्र वैद्यकीय पथके कार्यरत असतील. शहरातील पाच परिमंडळ कार्यालयांतील वैद्यकीय अधिकारी आणि १५ क्षेत्रीय कार्यालयांतील अधिकारी हे आरोग्य सेवांचा समन्वय साधणार आहेत.
दगडूशेठ हलवाई गणपती मंडळासमोरील बेलबाग चौक येथे गेल्या अकरा दिवसांपासून सुरु असलेले आरोग्य शिबिर विशेष लक्षवेधी ठरत आहे. या शिबिरात तीन आयसीयू बेडसह आपत्कालीन सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दिनांक २७ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत सुरू असलेल्या या सेवांचा लाभ आतापर्यंत २,००० हून अधिक नागरिकांनी घेतला आहे. याशिवाय पुणे महापालिका, ना.पै. मुरलीधर आण्णा मोहोळ विचार मंच आणि गणेशोत्सव सेवा सप्ताह यांच्या संयुक्त विद्यमाने दोन ऑक्सिजन बेड्सची सोयही येथे करण्यात आली आहे.
गणेश विसर्जनाच्या दिवशी म्हणजेच ६ सप्टेंबर आणि त्यानंतरच्या दिवशी म्हणजे ७ सप्टेंबर रोजी महापालिकेच्या अखत्यारीतील १२ बाह्यरुग्ण विभाग खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कमला नेहरू रुग्णालयात तातडीच्या आरोग्य सेवेसाठी दहा खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
शनिवारी महापालिकेला नियमित साप्ताहिक सुट्टी असली तरी आरोग्य विभागातील जवळपास ३०० वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी कर्तव्यावर उपस्थित राहणार आहेत. यामुळे विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळणार आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी एकूण ३० रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या असून यामध्ये १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका आणि महापालिकेच्या स्वतःच्या रुग्णवाहिकांचा समावेश आहे. या सर्व रुग्णवाहिका अत्यवस्थ रुग्णांना तातडीने रुग्णालयात हलवण्याचे काम करणार आहेत.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन मिरवणुका दिवसभर सुरू राहून रात्री उशिरापर्यंत चालतात. या कालावधीत डोल-ताशा पथकातील वादक, कलाकार, गणेश मंडळाचे कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने उपस्थित राहणारे नागरिक यांना वैद्यकीय मदतीची गरज भासू शकते. या सर्वांसाठी औषधे, साधनसामुग्री आणि प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही पुणे महापालिकेने विसर्जन मिरवणुकीसाठी वैद्यकीय यंत्रणा प्रभावीपणे सज्ज केली असून, नागरिकांना कोणत्याही प्रकारची आरोग्यविषयक अडचण भासू नये यासाठी सतत प्रयत्न केले जात आहेत.