Pune Crime News: पुणे स्टेशन परिसरात प्रवाशावर हल्ला, जबरी चोरी; रिक्षाचालकांसोबत दोन साथीदारांचा कट
पुणे स्टेशन परिसरात प्रवाशावर हल्ला, जबरी चोरी; रिक्षाचालकांसोबत दोन साथीदारांचा कट
पुणे रेल्वे स्टेशन परिसरात पहाटे तरुणावर रिक्षाचालक आणि दोन साथीदारांनी हल्ला करत 28,700 रुपयांची जबरी चोरी केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे.
सायली मेमाणे
पुणे 30 जुलै २०२५ : पुणे शहरात गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, पुणे रेल्वे स्थानक परिसरात रविवारी पहाटे घडलेली घटना याचेच एक ताजं उदाहरण आहे. विजय माने या २४ वर्षीय तरुणावर रिक्षाचालक आणि त्याच्या दोन साथीदारांनी एकत्रित हल्ला करून जबरी चोरी केली. ही घटना सव्वातीनच्या सुमारास ते चारच्या दरम्यान घडली. तक्रारदार विजय माने हे नवी मुंबई येथील रहिवासी असून, ते पुणे रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर रिक्षासाठी वाट पाहत होते. त्यावेळी एका रिक्षाचालकाने त्यांच्याशी संवाद साधून “मी सोडतो,” असं सांगत त्यांचा विश्वास संपादन केला.
रिक्षात आधीच दोन अनोळखी पुरुष बसलेले होते. तरुण त्या रिक्षात बसल्यानंतर टर्फ क्लब रेसकोर्समार्गे ते रस्ता घेत भैरोबा नाल्याच्या दिशेने गेले. अचानक त्या तिघांनी विजय यांच्यावर हल्ला करत त्यांचे दोन्ही हात पकडून मोबाईल, सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २८,७०० रुपयांचा ऐवज हिसकावून घेतला आणि नंतर रेल्वे स्टेशनच्या दिशेने रिक्षातून पळून गेले. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.
दुसरी धक्कादायक घटना सिंहगड रोडवरील वडगाव पुलाजवळ घडली. सूरज दरेकर या तरुणास तिघा अनोळखी व्यक्तींनी विनाकारण वाद घालत गळ्यातील दीड लाख रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून पळ काढला.
याशिवाय खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ढोले चौक येथे राधे सिंह आणि त्यांचा मित्र चालत असताना सलीम शेख आणि त्याच्या साथीदाराने त्यांना अडवून जीवे मारण्याची धमकी देत मोबाईल आणि नऊ हजार रुपये जबरदस्तीने हिसकावले. याप्रकरणी पोलिसांनी सलीम शेखला अटक केली असून दुसरा आरोपी फरार आहे. या घटनांमुळे पुणेकरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, नागरिकांनी रात्रीच्या वेळेस सावध राहण्याची गरज वाढली आहे.