Pune Crime: कोंढवा केसला धक्कादायक वळण, खोटी तक्रार महिला प्राध्यापकाच्या मार्गदर्शनाखाली?
कोंढवा केसला धक्कादायक वळण,
कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणात खोटी तक्रार दाखल; तरुणीला महिला प्राध्यापकाने मार्गदर्शन केल्याचा पोलिसांना संशय, पोलिसांची कारवाई.
सायली मेमाणे
पुणे ७ जुलै २०२५ : Pune Crime: कोंढवा येथील एका २२ वर्षीय तरुणीच्या खोट्या तक्रारीमुळे संपूर्ण पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणातील तपासात धक्कादायक माहिती पुढे आली असून, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या तरुणीने एका अनोळखी डिलिव्हरी एजंटने घरात घुसून तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार दिली होती, परंतु पोलिस तपासानंतर ती पूर्णतः खोटी ठरली. विशेष म्हणजे, ही तक्रार दाखल करण्यापूर्वी तरुणीने एका महिला प्राध्यापिकेकडून मार्गदर्शन घेतल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या घटनेची माहिती समोर येताच पुण्याच्या नागरिकांमध्ये खळबळ माजली होती. तरुणीने पोलिसांना सांगितले होते की, एका अनोळखी व्यक्तीने तिच्या पुण्यातील ११ व्या मजल्यावरील घरात घुसून तिच्यावर केमिकल स्प्रे केला आणि तिला बेशुद्ध केल्यानंतर बलात्कार केला. तसेच त्या व्यक्तीने तिच्या मोबाईलवरून सेल्फी काढून ‘मी परत येईन’ असा धमकीचा मेसेज टाकल्याचेही तिने सांगितले होते. मात्र, या कथनात सातत्य नसल्यामुळे पोलिसांनी तिच्याकडून अधिक तपशील घेतले आणि २४ तासांत ही तक्रार बनावट असल्याचे स्पष्ट झाले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, महिलेने खोटी माहिती दिली असून, खोट्या आरोपामुळे समाजात चुकीचा संदेश गेला आहे.
या घटनेत खरा तपास पुढे आला की, त्या दिवशी तिच्या घरात आलेली व्यक्ती तिचा मित्रच होता आणि त्याच्याच संमतीने तो सेल्फी काढण्यात आला होता. पोलिसांनी पुढे सांगितले की, सेल्फी एडिट करण्यात आला होता आणि धमकीचा मेसेजही त्या तरुणीने स्वतःच टाईप केला होता. पोलिसांच्या तपासात समोर आले की, त्यांच्यात पूर्वी वाद झाले होते आणि त्याच रागातून तरुणीने हे बनावट प्रकरण उभे केले. महिला आणि तिच्या मित्राला समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली आणि वैद्यकीय अहवालातूनही बलात्काराचे कोणतेही पुरावे समोर आले नाहीत.
पोलिसांनी या प्रकरणातील सर्व विधान आणि सबळ पुराव्यांच्या आधारे महिला प्राध्यापिकेचा जबाब नोंदवला आहे, जी तक्रारदार तरुणीची मैत्रीण असल्याचे तपासात समोर आले. या प्राध्यापिकेने तक्रार कशी करावी, काय बोलावे, याबाबत तिचे मार्गदर्शन केले होते. पोलिस उपआयुक्त राजकुमार शिंदे यांनी स्पष्ट केले की, जर गरज भासली तर प्राध्यापिकेला पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाईल. तक्रार दाखल करण्यामागे मानसिक अथवा भावनिक कारणे होती का, याचाही तपास केला जात आहे.
ही तरुणी डेटा सायन्समध्ये बीई पदवीधर असून, कल्याणीनगरमधील एका आयटी कंपनीत कार्यरत आहे. तिच्या तक्रारीनंतर देशभरात हे प्रकरण चर्चेचा विषय ठरले होते. परंतु, पोलिसांनी सतर्कतेने आणि त्वरेने तपास करून सत्य समोर आणल्याने पुणे पोलिस दलाचे कौतुक होत आहे. पोलिसांनी खोट्या तक्रारीविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा दिला असून, अशा प्रकारच्या बनावट गुन्ह्यामुळे कायदा व सुव्यवस्थेवर गडद परिणाम होतो, हे अधोरेखित केले आहे.