Pune Double Decker Buses: 30 वर्षांनंतर पुन्हा पुण्यात डबल डेकर बस सेवा सुरू, जाणून घ्या मार्ग आणि वैशिष्ट्ये
30 वर्षांनंतर पुन्हा पुण्यात डबल डेकर बस सेवा सुरू, जाणून घ्या मार्ग आणि वैशिष्ट्ये
PMPML कडून 30 वर्षांनंतर पुन्हा पुण्यात AC इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार आहेत. हिंजवडी, खराडी, मगरपट्टा आणि विमानतळ मार्गांवर या बसची चाचणी सुरू असून एका बसमध्ये 100 प्रवाशांची क्षमता आहे.
सायली मेमाणे
पुणे २७ सप्टेंबर २०२५ : पुण्यातील वाढती लोकसंख्या आणि त्यानुसार वाढणारी वाहतूक कोंडी ही मोठी समस्या ठरत आहे. नागरिकांना खाजगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा प्रभावी आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी PMPML सातत्याने प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर तब्बल 30 वर्षांनंतर पुणेकरांना पुन्हा एकदा डबल डेकर बसचा अनुभव घेता येणार आहे. पूर्वी डिझेलवर धावणाऱ्या या बसेस बंद झाल्या होत्या. मात्र आता पूर्णपणे इलेक्ट्रिक आणि वातानुकूलित अशा अत्याधुनिक डबल डेकर बस रस्त्यावर धावण्यासाठी सज्ज होत आहेत.
PMPML ने सप्टेंबरपासूनच या बसेसची चाचणी सुरू केली आहे. डबल डेकर बस सुरू करताना मार्ग निश्चित करणे हा मोठा मुद्दा होता. बसची उंची जास्त असल्याने पूल, फ्लायओव्हर आणि विजेच्या तारांचा अडथळा येऊ नये याची काळजी घेऊन चार प्रमुख मार्गांवर प्रायोगिक चाचणी घेण्यात आली आहे. हे मार्ग विशेषतः ज्या ठिकाणी प्रवाशांची संख्या जास्त आहे आणि आयटी हब किंवा महत्त्वाच्या ठिकाणांशी जोडणारे आहेत ते निवडले गेले आहेत.
चाचणीसाठी निवडलेले मार्ग पुढीलप्रमाणे आहेत. हिंजवडी फेज ते हिंजवडी फेज (वर्तुळ मार्ग) या बसमुळे आयटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. रामवाडी मेट्रो स्टेशन ते खराडी या मार्गावर प्रवाशांना थेट आणि आरामदायी कनेक्टिव्हिटी मिळेल. मगरपट्टा सिटी ते कल्याणीनगर मेट्रो स्टेशन या बससेवेचा लाभ या दोन्ही गर्दीच्या भागातील नागरिकांना होणार आहे. तर पुणे स्टेशन ते लोहगाव विमानतळ मार्गे विमाननगर हा मार्ग निवडल्याने रेल्वे स्टेशन आणि विमानतळ यांच्यातील प्रवास अधिक सुलभ होईल.
या AC इलेक्ट्रिक डबल डेकर बसची वैशिष्ट्ये पाहिली तर ती अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहे. एका बसमध्ये तब्बल 100 प्रवाशांची क्षमता असून, वातानुकूलित सोय प्रवास अधिक आरामदायी बनवेल. बसचे डिझाइन लंडनच्या प्रसिद्ध लाल डबल डेकर बसच्या धर्तीवर करण्यात आले आहे, त्यामुळे ती दिसायलाही आकर्षक आहे. एका बसची किंमत सुमारे 1.8 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या बसेसचे उत्पादन ‘स्विच मोबिलिटी’ (Switch Mobility) या कंपनीकडून करण्यात आले आहे.
पुण्यात डबल डेकर बस परत आणण्यामागे महत्त्वाचा उद्देश म्हणजे वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवणे आणि नागरिकांना खाजगी वाहनांपेक्षा सार्वजनिक वाहतुकीकडे वळवणे हा आहे. एकाचवेळी अधिक प्रवाशांना वाहतूक करण्याची क्षमता असल्याने या बसेसमुळे रस्त्यांवरील वाहनांचा ताण कमी होण्यास मदत होईल. PMPML ने सांगितले आहे की चाचणी यशस्वी झाल्यानंतर या बसेसची खरेदी प्रक्रिया सुरू केली जाईल आणि पुणे-पिंपरी चिंचवड परिसरात अधिक मार्गांवर या सेवा सुरू करण्याचा मानस आहे.
पुण्यातील प्रवाशांसाठी ही मोठी सोय ठरणार आहे. मेट्रो, इलेक्ट्रिक बसेस आणि आता डबल डेकर बस या सर्व उपक्रमांमुळे शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक आणि पर्यावरणपूरक होणार आहे. 30 वर्षांनंतर डबल डेकर बस पुन्हा रस्त्यावर धावणार असल्याने पुणेकरांमध्ये उत्सुकता आणि आनंद दोन्ही वातावरणात आहे.