Pune Ganesh Festival: जगात भारी आमचे पुणे! विसर्जन मिरवणुकीत ‘ढोल ताशां’च्या नवीन तालांची पर्वणी

0
जगात भारी आमचे पुणे! विसर्जन मिरवणुकीत ‘ढोल ताशां’च्या नवीन तालांची पर्वणी

जगात भारी आमचे पुणे! विसर्जन मिरवणुकीत ‘ढोल ताशां’च्या नवीन तालांची पर्वणी

Pune Ganesh Festival 2025: पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत 200 हून अधिक ढोल ताशा पथके सज्ज. पारंपरिक ठेक्यांसह ‘रामजी की सवारी, बांगडा, केरळी ठेका’ यांसारखे नवे ताल ऐकायला मिळणार.

सायली मेमाणे

पुणे ४ सप्टेंबर २०२५ : Pune Ganesh Festival म्हटले की सर्वात जास्त रंगत आणणारी गोष्ट म्हणजे विसर्जन मिरवणूक आणि त्यामधील ढोल ताशांचा गजर. ढोल, ताशे, ध्वज, संबळ, दिमटी, शंख यांचे आवाज पुण्याच्या गल्लीबोळात घुमू लागले की गणेशोत्सवाची खरी उत्साहवर्धक झलक दिसते. विसर्जन मिरवणूक ही पुण्याची ओळख ठरली असून यावर्षी 200 हून अधिक ढोल ताशा पथके या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. या पथकांनी आपल्या नव्या प्रयोगांनी आणि तालांनी विसर्जन मिरवणुकीत वेगळाच माहोल तयार करण्याची तयारी केली आहे.

गेल्या अनेक दशकांपासून गणपती विसर्जन आणि ढोल ताशे हे एकमेकांपासून वेगळेच होऊ शकत नाहीत. ढोल ताशांच्या ठेक्यांनी विसर्जनाची मिरवणूक नेहमीच गाजवली असून पुणेकरांसाठी ही एक पर्वणी असते. तरुणाईचा ओढा ढोल ताशा पथकांकडे वाढताना दिसतोय. तरुण-तरुणी उत्साहाने या पथकात सहभागी होत आहेत. महिलांचा सहभागदेखील मोठ्या प्रमाणावर दिसतोय आणि त्यांच्या आकर्षक पोशाख, नथ, बुगडी, विशेष केशरचना या मिरवणुकीच्या उत्सवात अधिक रंग भरतात.

यावर्षी समर्थ ढोल पथकाने रामजी की सवारी आणि बांगडा सारखे नवे ताल तयार केले असून, पारंपरिक ढोलाऐवजी परराज्यातील ढोल प्रथमच वापरणार असल्याची माहिती दिली आहे. अभेद्य पथकाने हे गणराया, ढोलीबाजा, महाकाल, भजनी ठेका यांसारख्या पारंपरिक ठेक्यांचे नवे व्हेरिएशन बसवले आहे. खास बाबू गेनू मंडळासाठी यावर्षीचा ‘केरळी ठेका’ ऐकायला मिळणार आहे. यामुळे विसर्जन मिरवणुकीला एक वेगळीच झलक मिळेल अशी अपेक्षा आहे.

कलावंत पथकाने यावर्षी ढोल, ताशा, ध्वज यासोबतच संबळाच्या तालातही नवीन प्रयोग केले आहेत. नागरिकांना या वादनाची विशेष उत्सुकता आहे. नूतन मराठी विद्यालय पथकाने दोनशे ते अडीचशे वर्षांपासून जपलेल्या परंपरा, यात्रा आणि जत्रांचे प्रात्यक्षिक ढोल ताशांच्या गजरासोबत दाखवण्याची तयारी केली आहे. पारंपरिक वेशभूषेत आणि उत्साही वातावरणात हे पथकही मिरवणुकीत आकर्षण ठरणार आहे.

यंदा पुणेकरांना केवळ पारंपरिक ठेक्यांचा आनंद नाही तर अगदी नवीन तालांचीही पर्वणी मिळणार आहे. कच्ची बाजा, जोगण, देवीचा ठेका, कावड, धमार, रावडी राठोड, भजनी ठेका, इंद्रजीमी जम्बपर, तिहाई आणि लावणी हे खास ताल या विसर्जन मिरवणुकीत ऐकायला मिळणार आहेत.

गणेशोत्सवाचा शेवट विसर्जन मिरवणुकीत होतो पण त्यात ढोल ताशांच्या तालांचा ठेका प्रत्येकाच्या मनात घर करून जातो. पुण्याची ही संस्कृती, परंपरा आणि कलावंतांची मेहनत यामुळेच शहराची मिरवणूक दरवर्षी अधिक भव्य ठरते. पुणेकर आणि पर्यटक यंदा ढोल ताशांच्या नव्या तालांनी भारावून जाणार आहेत यात शंका नाही.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *