पुण्यात विसर्जन मिरवणुकीदरम्यान महिला पत्रकाराचा विनयभंग, सहकाऱ्यालाही मारहाण

0

पुण्यात दगडूशेठ गणपती परिसरात विसर्जन मिरवणुकीचे वार्तांकन करताना महिला पत्रकाराचा विनयभंग झाला. ढोलताशा पथकातील सदस्यावर स्पर्श व ढकलण्याचा आरोप, सहकाऱ्यालाही शिवीगाळ आणि मारहाण.

सायली मेमाणे

पुणे ८ सप्टेंबर २०२५ : पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिर परिसरात विसर्जन मिरवणुकीदरम्यान वार्तांकन करताना एका महिला पत्रकाराचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी संध्याकाळी घडली असून, पत्रकार व तिच्या सहकाऱ्याने पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिला पत्रकार आपल्या सहकाऱ्यासोबत वार्तांकनासाठी दगडूशेठ गणपती विसर्जन मिरवणुकीत गेल्या होत्या. यावेळी परिसरात उपस्थित असलेल्या त्रिताल ढोलताशा पथकातील सदस्यांनी त्यांच्या मार्गात अडथळा निर्माण केला. त्याचवेळी एका सदस्याने ढोल-ताशा ट्रॉलीचे चाक पत्रकाराच्या पायावरून फिरवले. याचा जाब विचारण्यासाठी पत्रकार त्या सदस्याजवळ गेल्या असता, त्याने त्यांना अनुचितरित्या स्पर्श करून ढकलून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या पत्रकाराच्या सहकाऱ्याने याबाबत आक्षेप नोंदवला असता, त्या सदस्याने त्यालाही शिवीगाळ करून मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या घटनेनंतर परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. इतर पत्रकार व नागरिकांनी या घटनेचा निषेध केला असून, महिला पत्रकारांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सध्या पोलिसांनी संबंधित पत्रकाराच्या तक्रारीची दखल घेतली असून, चौकशी सुरू केली आहे. पोलिस सूत्रांनुसार, या प्रकरणात गुन्हा दाखल करून संबंधित ढोलताशा पथकातील सदस्याविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे. गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत अशी घटना घडल्याने वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

यापूर्वीही उत्सव किंवा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये पत्रकारांवर हल्ला किंवा विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पत्रकार संघटनांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली असून, अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी सुरक्षा उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.

या घटनेमुळे पुण्यातील पत्रकारितेच्या क्षेत्रात संतापाची लाट पसरली आहे. महिला पत्रकार सुरक्षित नसतील, तर प्रसारमाध्यमांवर बंधन येईल असा इशारा काही पत्रकार संघटनांनी दिला आहे. सध्या हा प्रकार पुणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत असून, दोषींवर तातडीने कायदेशीर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *