पुणे काळेपडळ पोलीस स्टेशन: ऑटो रिक्षा टायर व स्टेफनी चोरी करणारा २४ तासात जेरबंद
पुणे काळेपडळ पोलीस स्टेशन: ऑटो रिक्षा टायर व स्टेफनी चोरी करणारा २४ तासात जेरबंद
पुणे काळेपडळ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने २४ तासांत ऑटो रिक्षा टायर आणि स्टेफनी चोरी करणारा शादाब युसुफ अन्सारी याला ताब्यात घेतले; आरोपीने २.५६,००० रुपयांच्या दोन रिक्षा, टायर आणि स्टेफनी चोरीची कबुली दिली.
सायली मेमाणे
पुणे ९ ऑक्टोबर २०२५ : पुणे शहरातील काळेपडळ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अत्यंत जलद आणि कार्यक्षम कारवाई करत ऑटो रिक्षा टायर व स्टेफनी चोरी करणारा आरोपी २४ तासांत जेरबंद केला. गुन्हा नोंद क्रमांक ३९५/२०२५, भा.न्या.सं.क. ३०३ (२) नुसार, आरोपीच्या शोधासाठी पोलिस तपास पथकाने पेट्रोलिंग सुरू केले असता, पोलीस अंमलदार शाहिद शेख व अतुल पंधरकर यांना खात्रीशीर बातमी मिळाली की एक व्यक्ती लक्ष्मीपार्क मार्गावरील गौरी हॉटेलच्या बाजुला रिक्षासह थांबलेला आहे, ज्यामध्ये टायर चोरीचे आहेत.
या बातमीच्या आधारे वरिष्ठांचे आदेश घेऊन पोलिसांनी तात्काळ सदर ठिकाणी धडक मोहीम राबवली. या कारवाईत शादाब युसुफ अन्सारी, वय २० वर्षे, रा. गल्ली नं. २४, सय्यदनगर, हडपसर, पुणे याला ताब्यात घेतले गेले. आरोपीने तपासादरम्यान २.५६,००० रुपयांच्या दोन रिक्षा, रिक्षांचे टायर आणि स्टेफनी चोरी केले असल्याची कबुली दिली.
ही कारवाई पुणे शहरातील पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ५, पुणे शहर, डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग श्री. धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळेपडळ पोलीस स्टेशन, श्री. मानसिंग पाटील व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री अमर काळंगे यांनी तपास पथकाचे सुत्रसंचालन केले.
तपास पथकामध्ये सहा पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस अंमलदार प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, श्रीकृष्ण खोकले, विशाल ठोंबरे, शाहीद शेख, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर व महादेव शिदे यांनी सहभाग घेतला. त्यांनी त्वरीत पथक तयार करून चोरीचा आरोपी अटक केली व चोरीचे साहित्य जप्त केले.
पोलीसांच्या जलद आणि सक्षम कारवाईमुळे पुणे शहरातील ऑटो रिक्षा मालकांना दिलासा मिळाला आहे. अशा कारवायांमुळे नागरिकांमध्ये पोलीस यंत्रणेबद्दल विश्वास वाढत आहे, तसेच अपहरण, चोरी व इतर गुन्ह्यांवर तत्काळ कारवाई होण्याची क्षमता प्रदर्शित होते. स्थानिक नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले असून, पोलीस पथकाच्या या यशस्वी मोहिमेला कौतुक केले आहे.
या प्रकाराने दाखवून दिले आहे की, तत्पर पोलीस पथक आणि नागरिकांच्या सहयोगामुळे गुन्हेगारांना अटक करण्याची प्रक्रिया अधिक प्रभावी होऊ शकते. पुणे शहरातील काळेपडळ पोलीस स्टेशनच्या या यशस्वी कारवाईतून चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यास महत्त्वाचा हातभार लागणार आहे.