दिवाळी स्पेशल ट्रेन: हडपसर–लातूर दरम्यान २६ सप्टेंबर ते २८ नोव्हेंबर विशेष गाड्यांची घोषणा
दिवाळी स्पेशल ट्रेन: हडपसर–लातूर दरम्यान २६ सप्टेंबर ते २८ नोव्हेंबर विशेष गाड्यांची घोषणा
दिवाळी गर्दीचा विचार करून हडपसर–लातूर दरम्यान विशेष गाड्या चालणार. प्रवास वेळापत्रक, थांबे आणि सेवा दिवस जाणून घ्या.
सायली मेमाणे
पुणे १० सप्टेंबर २०२५ : पुणेकर आणि मराठवाड्यातील प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने दिवाळी काळात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दिवाळी सुट्टीत मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेऊन हडपसर–लातूर दरम्यान विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. या गाड्या २६ सप्टेंबरपासून २८ नोव्हेंबरपर्यंत धावणार असून आठवड्यातील सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी सेवा उपलब्ध राहणार आहे.
गाडी क्रमांक ०१४२९ लातूरहून सकाळी ९:३० वाजता सुटेल. या गाडीला हरंगुळ, उस्मानाबाद, बार्शी टाउन, कुर्डुवाडी, जेऊर आणि दौंड येथे थांबे असतील. दुपारी ३:३० वाजता ही गाडी हडपसर स्थानकात पोहोचेल. या प्रवासाचा कालावधी ६ तास १० मिनिटांचा असेल. दिवाळीच्या सुट्टीत पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना ही गाडी मोठी सुविधा ठरणार आहे.
गाडी क्रमांक ०१४३० हडपसरहून दुपारी ४:०५ वाजता सुटेल. दौंड, जेऊर, कुर्डुवाडी, बार्शी टाउन, धाराशिव आणि हरंगुळ या स्थानकांवर थांबल्यानंतर ही गाडी रात्री ९:२० वाजता लातूर स्थानकात पोहोचेल. या प्रवासाचा कालावधी ५ तास १५ मिनिटांचा असेल.
दिवाळी काळात पुणे आणि लातूरदरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे तिकीटांसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि प्रवाशांना अतिरिक्त सोय मिळावी यासाठी रेल्वे प्रशासनाने हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. दरवर्षी सणासुदीच्या काळात रेल्वेत प्रचंड गर्दी असते. आरक्षणाची कमतरता भासते, तिकीट मिळणे कठीण होते. त्यामुळे या अतिरिक्त गाड्यांचा निर्णय हा प्रवाशांसाठी दिलासा देणारा आहे.
लातूरहून पुण्याकडे कामानिमित्त, शिक्षणासाठी आणि सणासुदीच्या भेटीसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ही गाडी उपयुक्त ठरणार आहे. तसेच दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे पुण्यातून आपल्या गावी परतणाऱ्यांना लातूरकडे जाण्यासाठी ही गाडी सोयीची ठरणार आहे. रेल्वे प्रशासनाने वेळापत्रक व थांबे स्पष्ट करून प्रवाशांना आधीपासून नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.
या विशेष गाड्यांच्या धावणीमुळे तिकीट बुकिंगसाठी होणारी धावपळ काही प्रमाणात कमी होईल अशी अपेक्षा आहे. रेल्वेने जाहीर केलेले वेळापत्रक आणि थांबे प्रवाशांच्या सोयीसाठी ठेवले असून, याचा फायदा मोठ्या संख्येने नागरिकांना होईल. दिवाळीच्या काळात रेल्वे तिकीटांसाठी नेहमीच मोठी मागणी असते, त्यामुळे प्रवाशांनी लवकर आरक्षण करून घ्यावे, असे आवाहनही रेल्वेकडून करण्यात आले आहे.
या उपक्रमामुळे पुणे-लातूर मार्गावरील प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे. दिवाळी सणाचा आनंद घेण्यासाठी आणि आपल्या प्रियजनांना भेटण्यासाठी प्रवाशांना या गाड्या उपयोगी पडतील, यात शंका नाही.