राष्ट्रीय लोकअदालतीत वाहतूक दंडावर मोठी सवलत; पुणेकरांसाठी थकबाकी भरण्याची सुवर्णसंधी
राष्ट्रीय लोकअदालतीत वाहतूक दंडावर मोठी सवलत; पुणेकरांसाठी थकबाकी भरण्याची सुवर्णसंधी
पुण्यात १० ते १३ सप्टेंबरदरम्यान राष्ट्रीय लोकअदालतीत प्रलंबित वाहतूक दंड जास्तीत जास्त सवलतीत भरण्याची संधी. हेल्मेट, सीटबेल्ट, सिग्नल तोडणे यांसारख्या नियमभंगांवर मोठा दिलासा.
सायली मेमाणे
पुणे १० सप्टेंबर २०२५ : पुणेकरांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. वाहतूक नियमभंगांवर थकलेले प्रलंबित दंड आता जास्तीत जास्त सवलतीत भरता येणार आहेत. राष्ट्रीय लोकअदालतीत हेल्मेट किंवा सीटबेल्ट न वापरणे, सिग्नल तोडणे, विना नंबरप्लेट वाहन चालविणे यांसारख्या छोट्या वाहतूक नियमभंगांच्या दंडांची सोय करण्यात आली आहे. बुधवारपासून शनिवारपर्यंत म्हणजेच १० ते १३ सप्टेंबर या कालावधीत पुणेकरांना प्रलंबित दंड सवलतीच्या दरात भरण्याची संधी मिळणार आहे. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला असून येरवडा पोस्ट ऑफिसशेजारील वाहतूक शाखेच्या कार्यालयात सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत नागरिकांना थकबाकीमुक्त होता येईल.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पुण्यातील सर्व न्यायालयांमध्ये १३ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रमुख जिल्हा न्यायाधीश आणि पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष महेंद्र महाजन, सचिव न्यायाधीश सोनल पाटील, मोटार वाहन न्यायालयाचे न्यायाधीश एस. बी. पाटील, पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि वाहतूक शाखेचे उपायुक्त हिम्मत जाधव यांच्या पुढाकारातून दंडात्मक ई-चलनाचे दावे तडजोडीतून निकाली काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या उपक्रमात विनाहेल्मेट दुचाकी चालविणे, सीटबेल्ट न लावता चारचाकी चालविणे, सिग्नल तोडणे, वेगमर्यादा ओलांडणे, चुकीचे पार्किंग, वाहन चालविताना मोबाइलचा वापर, विनापरवाना किंवा विना पीयूसी वाहन चालविणे, फिटनेस प्रमाणपत्र नसणे, चुकीच्या लेनमध्ये वाहन चालविणे तसेच नंबरप्लेट नसणे या प्रकारच्या प्रलंबित दंडांवर सवलत मिळणार आहे.
मात्र काही गंभीर नियमभंगांवर सवलत मिळणार नाही. त्यात मद्यपान करून वाहन चालविणे, अपघात करून पळ काढणे, निष्काळजीपणे वाहन चालवून प्राणांतिक अपघात करणे, अल्पवयीन मुलाने वाहन चालविणे, अनधिकृत शर्यत घेणे, गुन्ह्यांसाठी वाहनांचा वापर करणे, न्यायालयात सुनावणी प्रलंबित असलेली प्रकरणे तसेच अन्य राज्यातील वाहतूक नियमभंगांची चलने यांचा समावेश आहे.
नागरिकांनी या लोकअदालतीत सहभागी होऊन थकबाकीमुक्त होण्याची ही उत्तम संधी गमावू नये, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी केले आहे. त्यांच्या मते, या उपक्रमातून नागरिकांना कायदेशीर सोप्या मार्गाने दंड निकाली काढता येईल. सचिव न्यायाधीश सोनल पाटील यांच्या मते, या उपक्रमामुळे वाहतूक नियमांविषयी जनजागृती होईल आणि शिस्तबद्ध वाहतुकीला चालना मिळेल.
या लोकअदालतीमुळे अनेक नागरिकांना प्रलंबित ई-चलनाचा बोजा हलका करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे पुणेकरांनी दिलेल्या कालावधीत हजेरी लावून सवलतीचा लाभ घ्यावा आणि वाहतूक शिस्तीचे पालन करून सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असा संदेश प्रशासनाने दिला आहे.