पुण्यातील अधिछात्रवृत्ती विलंब: महाज्योती विद्यार्थ्यांना आर्थिक व मानसिक ताण
पुण्यातील अधिछात्रवृत्ती विलंब: महाज्योती विद्यार्थ्यांना आर्थिक व मानसिक ताण
पुण्यात महाज्योती विद्यार्थ्यांना अद्याप पदव्युत्तर अधिछात्रवृत्तीची प्रतीक्षा करावी लागते, तर बार्टी आणि सारथी संस्थांना निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. स्टायपेंड वितरणातील विलंब विद्यार्थ्यांच्या संशोधनावर परिणाम करत असून मानसिक ताण निर्माण करत आहे.
सायली मेमाणे
पुणे १७ सप्टेंबर २०२५ : पुण्यातील महाज्योती संस्थेच्या अधिछात्रवृत्ती वितरणात गंभीर दिरंगाई असल्याने विद्यार्थ्यांच्या आर्थिक आणि मानसिक अडचणी वाढल्या आहेत. राज्यातील ओबीसी, भटके विमुक्त विद्यार्थ्यांना संशोधनासाठी महाज्योतीकडून मिळणाऱ्या निधीत विलंब होत आहे. शासनाने नोंदणी दिनांकापासून अधिछात्रवृत्ती मंजूर केली असूनही, संस्थेने निधीअभावी २५ जुलै २०२४ पासूनच वितरित करण्याचा निर्णय घेतला होता.
बार्टी आणि सारथी संस्थांना निधी उपलब्ध करून देण्यात आला असताना महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना अद्यापही अधिछात्रवृत्तीची प्रतीक्षा करावी लागत आहे. संशोधनासाठी सहा महिन्यांनी मिळणारी ही रक्कम विद्यार्थ्यांचा मुख्य आधार असून, विलंबामुळे त्यांच्या संशोधनकार्यावर प्रतिकूल परिणाम होत आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारीनुसार, कागदपत्रे वेळेवर जमा करूनही स्टायपेंडशीट तयार होत नाही, उपयोगिता प्रमाणपत्रात सतत त्रुटी काढल्या जातात, कार्यालयाशी संपर्क साधला तरी फोन घेतला जात नाही, तर कर्मचारी उद्धट भाषेत उत्तरे देतात.
अलीकडेच आमदार अभिजित वंजारी यांच्या उपस्थितीत महाज्योती व्यवस्थापन व विद्यार्थी शिष्टमंडळाची बैठक घेण्यात आली होती. व्यवस्थापकांनी तातडीने कारवाईचे आश्वासन दिले असले तरी अद्याप परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. जानेवारी ते जून २०२५ या कालावधीत मिळणारी अधिछात्रवृत्ती फक्त २१२ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली असून उर्वरित ६८८ विद्यार्थ्यांची रक्कम अद्याप थांबवण्यात आली आहे.
महाज्योतीच्या धोरणांमुळे संशोधनासाठी नोकरी किंवा व्यवसाय करता न येणाऱ्या विद्यार्थ्यांचे वास्तव्य, दैनंदिन खर्च आणि संशोधनकार्य गंभीर संकटात आले आहे. कागदपत्रे जमा करून एक महिन्याहून अधिक कालावधी उलटला तरी अनेक विद्यार्थी स्टायपेंडशीट मिळण्याची प्रतीक्षा करत आहेत. खात्यात पैसे जमा होण्याऐवजी कर्मचारी उद्धट भाषेत विद्यार्थ्यांशी संवाद साधत असल्याने मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
विद्यार्थी अतुल मरेवाड व अक्षय अनाप यांनी सांगितले की, महाज्योती संस्थेमध्ये गेल्या महिन्यापासून सर्व आवश्यक डॉक्युमेंट्स पाठवले आहेत. तरीही आर एस सी रिपोर्टमध्ये जोडलेले नसल्याचे कारण दाखवून त्रुटी दाखवली जात आहे. कॉल केल्यासही कर्मचारी फोन उचलत नाहीत किंवा वेगवेगळ्या पद्धतीने बोलतात. या समस्यांमुळे विद्यार्थ्यांना मानसिक ताण सहन करावा लागत आहे. त्यांनी शासनाकडे विनंती केली आहे की, नोंदणी दिनांकापासून फेलोशिप लवकरात लवकर वितरित करावी आणि महाज्योती संस्थेतील कर्मचाऱ्यांविरोधात योग्य ती कार्यवाही केली जावी.
अधिछात्रवृत्तीच्या विलंबामुळे विद्यार्थ्यांचे संशोधन कार्य ठप्प झाले आहे आणि त्यांचे शिक्षण व आर्थिक सुरक्षितता धोक्यात आलेली आहे. शासनाने तातडीने लक्ष घालून योग्य कारवाई केली तर हजारो संशोधक विद्यार्थ्यांना न्याय मिळेल आणि भविष्यात अशा प्रकारच्या अडचणी टाळता येऊ शकतील.