Pune Metro: गणेशोत्सवात मेट्रो मालामाल १२ दिवसांत ४८.३२ लाख प्रवासी, ₹७.४९ कोटी उत्पन्न

Pune Metro: गणेशोत्सवात मेट्रो मालामाल १२ दिवसांत ४८.३२ लाख प्रवासी, ₹७.४९ कोटी उत्पन्न
Pune Metro ने गणेशोत्सवाच्या १२ दिवसांत ४८.३२ लाखांहून अधिक प्रवाशांची वाहतूक केली. मेट्रोला ₹७.४९ कोटींचे उत्पन्न मिळाले. मंडई स्थानकावर सर्वाधिक गर्दी.
पुणे, २६ सप्टेंबर २०२६ : पुण्यातील गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक वाहतुकीला प्रवाशांनी मोठी पसंती दिल्याचे पुणे मेट्रोच्या आकडेवारीतून समोर आले आहे. १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या १२ दिवसांच्या कालावधीत पुणे मेट्रोने तब्बल ४८ लाख ३२ हजार ९१५ प्रवाशांची वाहतूक केली. या कालावधीत मेट्रोला ७ कोटी ४९ लाख २८ हजार ३७७ रुपयांचे महसुली उत्पन्न मिळाले. उत्सवाच्या काळात शहरातील प्रमुख भागांमध्ये होणारी गर्दी आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेता मेट्रो सेवा प्रवाशांसाठी महत्त्वाची ठरली.
अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी मेट्रोच्या प्रवासी संख्येत विशेष वाढ झाली. २५ सप्टेंबर सकाळी ६ वाजल्यापासून २६ सप्टेंबर सकाळी ६ वाजेपर्यंतच्या २४ तासांत तब्बल ५ लाख ८० हजार २८० प्रवाशांनी मेट्रोचा वापर केला. या एका दिवसात मेट्रोला ८५ लाख ६१ हजार ८९५ रुपयांचे उत्पन्न मिळाले.
गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदाच्या गणेशोत्सवात मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. २०२४ मध्ये गणेशोत्सवाच्या कालावधीत २० लाख ४५ हजार १०० प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला होता. २०२५ मध्ये ही संख्या ३७ लाख १७ हजार ५७८ इतकी झाली. यंदा प्रवासी संख्या ४८ लाख ३२ हजार ९१५ वर पोहोचली. म्हणजेच २०२५च्या तुलनेत यंदा प्रवासी संख्येत २९.९९ टक्के वाढ झाली आहे.
गणेशोत्सवाच्या १२ दिवसांत मेट्रोच्या मार्गिका १ वर २५ लाख १५ हजार ५१६, तर मार्गिका २ वर २३ लाख १७ हजार ३९९ प्रवाशांनी प्रवास केला. मार्गिका १ मधून ४ कोटी १७ लाख ४६ हजार ६२६ रुपये, तर मार्गिका २ मधून ३ कोटी ३१ लाख ८१ हजार ७५१ रुपयांचा महसूल मिळाला.
या कालावधीत महात्मा फुले मंडई मेट्रो स्थानक सर्वाधिक गर्दीचे ठरले. येथे ६ लाख ८२ हजार ४७३ प्रवाशांची नोंद झाली असून, या स्थानकातून १ कोटी १ लाख ८५ हजार २५५ रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यानंतर पीसीएमसी स्थानकावर ४ लाख ७२ हजार ६५८, स्वारगेटवर ४ लाख ३५ हजार ४८९, रामवाडीवर ४ लाख ५ हजार ४४७ आणि पीएमसी स्थानकावर २ लाख ६९ हजार ४७७ प्रवाशांची नोंद झाली.
मेट्रोच्या दोन्ही मार्गिकांना जोडणारे जिल्हा न्यायालय स्थानकही गणेशोत्सवात महत्त्वाचे इंटरचेंज ठरले. १२ दिवसांत तब्बल १० लाख ३९ हजार ४५२ प्रवाशांनी येथे मार्गिका बदलून पुढील प्रवास केला. केवळ विसर्जनाच्या २४ तासांत १ लाख २२ हजार ५५२ प्रवाशांनी या इंटरचेंज सुविधेचा वापर केला.
तिकीट व्यवस्थेत डिजिटल पद्धतीलाही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. गणेशोत्सवाच्या १२ दिवसांत ७१ टक्के प्रवाशांनी डिजिटल तिकीट प्रणालीचा वापर केला, तर २९ टक्के प्रवाशांनी कागदी तिकीट घेतले. एकूण व्यवहारांपैकी ८६ टक्के प्रवाशांनी ऑनलाइन, यूपीआय किंवा कार्डद्वारे पैसे भरले. केवळ १४ टक्के व्यवहार रोख स्वरूपात झाले.
विसर्जनाच्या दिवशी महात्मा फुले मंडई, डेक्कन जिमखाना, स्वारगेट, पीसीएमसी, रामवाडी, पीएमसी, वनाज, नळ स्टॉप, गरवारे कॉलेज, छत्रपती संभाजी महाराज उद्यान आणि पुणे रेल्वे स्टेशन या ११ स्थानकांवर २० हजारांहून अधिक प्रवाशांची नोंद झाली. वाढती गर्दी लक्षात घेऊन महामेट्रोने मेट्रोची वारंवारिता पाच मिनिटांवर आणली होती. तसेच विसर्जनाच्या दिवशी २४ तास अखंडित सेवा देण्यात आली. स्वारगेट, महात्मा फुले मंडई आणि डेक्कन जिमखाना या प्रमुख स्थानकांवर वैद्यकीय सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या.
Also Read: Pune’s Latest Information
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information
FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare