गणेशोत्सवात पुणे मेट्रोची झेप; दिवसाला ३ लाखांहून अधिक भाविकांचा प्रवास
गणेशोत्सवात पुणे मेट्रोची झेप; दिवसाला ३ लाखांहून अधिक भाविकांचा प्रवास
पुणे गणेशोत्सवात मेट्रोला प्रचंड प्रतिसाद. दररोज तीन लाखांहून अधिक भाविकांचा प्रवास, विसर्जनादिवशी तब्बल ४१ तास सेवा उपलब्ध.
सायली मेमाणे
पुणे ५ सप्टेंबर २०२५ : पुणे शहरातील गणेशोत्सव हे जागतिक स्तरावर प्रसिद्ध असून, दरवर्षी हजारो-लाखो भाविक पुण्यात दाखल होतात. यंदा गणेशोत्सवाला विशेष महत्त्व लाभले आहे कारण पुणे मेट्रोचे दोन्ही मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहेत. त्यामुळे भाविकांना प्रवासासाठी सोयीस्कर, जलद आणि सुरक्षित पर्याय उपलब्ध झाला आहे. या नव्या सुविधेमुळे गणेशोत्सवात मेट्रोच्या प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढ झाल्याचे मेट्रो प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रो प्रशासनाने विशेष नियोजन केले होते. नियमितपणे मेट्रोच्या दोन्ही मार्गांवर ५५४ फेऱ्या होत असल्या तरी, वाढत्या गर्दीचा विचार करून आता ७४० फेऱ्या सुरु करण्यात आल्या आहेत. यामुळे भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास न होता दर्शनासाठी वेळेवर पोहोचणे शक्य होत आहे. मेट्रोचे अतिरिक्त महासंचालक चंद्रशेखर तांभवेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवाच्या आधी दररोज सुमारे दोन लाख प्रवासी मेट्रोने प्रवास करत होते. मात्र, सध्या ती संख्या वाढून दररोज तीन ते सव्वा तीन लाख प्रवाशांपर्यंत पोहोचली आहे.
या वाढलेल्या प्रवाशांमध्ये विशेषतः कसबा, मंडई आणि स्वारगेट परिसरातील गणेश मंडळांना भेट देणाऱ्या भाविकांचा मोठा वाटा आहे. यामध्ये मंडई स्थानक हे सर्वाधिक गर्दीचे केंद्र ठरत असून, हजारो भाविक या मार्गाचा वापर करत आहेत. मेट्रो प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त कर्मचारी, सुरक्षा यंत्रणा आणि माहिती फलक उपलब्ध करून दिले आहेत.
गणेश विसर्जनाच्या दिवशी भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन मेट्रो प्रशासनाने विशेष निर्णय घेतला आहे. विसर्जनाच्या दिवशी मेट्रो सेवा सकाळी ६ वाजल्यापासून अखंड ४१ तास सुरु राहणार असून, दुसऱ्या दिवशी रात्री ११ वाजेपर्यंत भाविकांना सेवा उपलब्ध असेल. हा निर्णय पुणेकरांसाठी अत्यंत सोयीस्कर ठरणार असून, वाहतूक कोंडी आणि इतर अडचणी टाळण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
यावर्षी केवळ गणेशोत्सवातच नव्हे तर, जून महिन्यातही मेट्रोच्या प्रवाशांची संख्या विक्रमी नोंदवली गेली होती. एका महिन्यात तब्बल ५२ लाख ५७ हजार प्रवाशांनी मेट्रो सेवेचा वापर केला. हा मेट्रोच्या इतिहासातील सर्वात मोठा मासिक टप्पा असून, एका महिन्यात ५० लाख प्रवाशांचा टप्पा ओलांडणारी ही पहिलीच वेळ आहे. यावरून पुणेकरांनी मेट्रोला दिलेला प्रतिसाद स्पष्टपणे दिसून येतो.
गणेशोत्सवात वाढलेल्या प्रवाशांमुळे मेट्रो प्रशासनाने आपली क्षमता आणि नियोजन क्षमता सिद्ध केली आहे. पारंपरिक गणेशोत्सवाची रंगत आणि आधुनिक वाहतुकीची सुविधा यांचा समन्वय पुणेकरांसाठी नवा अनुभव ठरत आहे. पुण्यातील नागरिक आणि भाविक मेट्रोच्या मदतीने सुरक्षित, वेळेवर आणि आरामदायी प्रवास करत आहेत. त्यामुळे, मेट्रोचा वापर भाविकांसाठी गणेशोत्सवाचा अविभाज्य भाग ठरत असून, पुणे शहराच्या वाहतूक व्यवस्थेतील एक मोठा बदल म्हणून नोंदला जात आहे.