पुण्यातील पोल्ट्री गोडाऊनला भीषण आग; लाखोंचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली
पुण्यातील पोल्ट्री गोडाऊनला भीषण आग; लाखोंचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील कोळवण गावात पोल्ट्री गोडाऊनला मध्यरात्री भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीत लाखोंचे नुकसान झाले, मात्र जीवितहानी टळली.
सायली मेमाणे
पुणे ९ सप्टेंबर २०२५ :पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात रविवारी मध्यरात्री भीषण आग लागून परिसरात एकच खळबळ उडाली. कोळवण गावातील पोल्ट्री गोडाऊनमध्ये ही घटना घडली असून, यात लाखोंचे आर्थिक नुकसान झाले आहे. गोडाऊनचे मालक डॉ. अजय देशपांडे आहेत. रात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास गोडाऊनमधून अचानक धुराचे लोट बाहेर येताना दिसल्याने स्थानिकांना घटनेची माहिती मिळाली.
प्राथमिक अंदाजानुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी. पोल्ट्रीतील कामगार संभाजी गुरव यांनी आग पाहताच तातडीने आग विझवण्याचा प्रयत्न केला, तसेच पौड पोलिस ठाण्यात याची माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशामक जवानांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले आणि मोठा अनर्थ टाळला.
या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र गोडाऊनमध्ये ठेवलेले खाद्यपदार्थांच्या ४००० रिकाम्या गोण्या, हिशोबाची पुस्तके आणि इतर साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. त्यामुळे मालक डॉ. देशपांडे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेचा पंचनामा केला असून नुकसानाची नेमकी आकडेवारी अद्याप स्पष्ट झालेली नाही.
या आगीमुळे गावात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री उशिरापर्यंत गावकरी आणि अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. पोल्ट्री गोडाऊनजवळ राहणाऱ्या कुटुंबांनी घाबरून घराबाहेर पडून सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला होता.
मुळशी तालुक्यात यापूर्वीही शॉर्ट सर्किटमुळे आगी लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे वीजजोडणी, वायरिंग आणि सुरक्षा साधनांची नियमित तपासणी करणे किती आवश्यक आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांनी पोल्ट्री आणि गोडाऊनमधील सुरक्षा उपायांबाबत अधिक दक्षता घेण्याची मागणी केली आहे.
अग्निशमन दलाने तातडीने नियंत्रण मिळवले नसते तर गोडाऊनच्या परिसरातील इतर घरे आणि शेतजमिनींनाही धोका निर्माण झाला असता. त्यामुळे त्यांच्या तत्परतेबद्दल स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पोलिसांनी याबाबतचा तपास सुरू केला असून शॉर्ट सर्किटच कारण आहे का, हे तपासले जात आहे.