Pune News : रक्तगट न जुळता देखील तरुणाचे यशस्वी किडनी प्रत्यारोपण; पुण्यातील डॉक्टरांचे कौतुक
रक्तगट न जुळता देखील तरुणाचे यशस्वी किडनी प्रत्यारोपण
बांगलादेशातील ३१ वर्षीय तरुणाचे पुण्यात रक्तगट न जुळता किडनी प्रत्यारोपण यशस्वी; नोबल हॉस्पिटलमधील डॉक्टरांची कामगिरी उल्लेखनीय.
सायली मेमाणे
पुणे ७ जुलै २०२५ : पुण्यात आरोग्य क्षेत्रात एक प्रेरणादायक आणि दुर्मीळ वैद्यकीय यश नोंदवले गेले आहे. बांगलादेशातील ३१ वर्षीय तरुणाच्या किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया त्याच्या आईकडून मूत्रपिंड दान मिळवून यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. विशेष बाब म्हणजे आई आणि मुलाचा रक्तगट जुळत नव्हता, तरीही पुण्यातील ‘नोबल हॉस्पिटल’च्या डॉक्टरांनी अत्यंत कौशल्यपूर्वक आणि सुसंवाद साधून प्रत्यारोपण यशस्वी केले. हा तरुण आयजीए नेफ्रोपॅथी (बर्जर्स डिसीज) या दुर्मीळ मूत्रपिंड विकाराने ग्रस्त होता. ही अवस्था शरीरात प्रतिपिंड तयार करून मूत्रपिंडाची कार्यक्षमता कमी करते आणि कालांतराने किडनी पूर्णतः निकामी होते. त्यामुळे डायलिसिसवर असलेल्या रुग्णासाठी प्रत्यारोपण हा एकमेव उपाय होता.
या रुग्णाच्या कुटुंबात आईच एकमेव संभाव्य दाते होती. मात्र, रुग्णाचा रक्तगट ‘बी पॉझिटिव्ह’ आणि आईचा ‘एबी पॉझिटिव्ह’ असल्याने, सामान्यपणे हे प्रत्यारोपण शक्य नव्हते. कारण ‘बी पॉझिटिव्ह’ रुग्णाला केवळ ‘बी’ किंवा ‘ओ’ रक्तगट असलेल्या दात्याचे अवयव स्वीकारता येतात. यामुळे रुग्णाच्या शरीरात प्रतिपिंड तयार होण्याचा धोका मोठा होता, जो प्रत्यारोपण नाकारण्यास कारणीभूत ठरू शकतो. यासाठी डॉक्टरांनी एक अत्याधुनिक उपचारपद्धती अवलंबली. प्रथम रुग्णाच्या शरीरातील प्रतिपिंड तयार होण्याची क्षमता कमी करणारी विशिष्ट इंजेक्शन्स देण्यात आली. त्यानंतर प्लाझ्मा फेरेसिस नावाच्या प्रक्रियेद्वारे रुग्णाच्या रक्तातील आधीपासून अस्तित्वात असलेले प्रतिपिंड शरीराबाहेर काढण्यात आले.
‘नोबल हॉस्पिटल’चे प्रत्यारोपण विशेषज्ञ डॉ. अविनाश इग्नाशिअस यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या प्रत्यारोपणात अनेक धोके संभवतात – शरीर नवीन अवयव नाकारणे, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे, संसर्ग होणे इत्यादी. त्यामुळे संपूर्ण शस्त्रक्रिया काळजीपूर्वक नियोजनानंतर पार पाडण्यात आली. या उपचारपद्धतीत विविध विभागांतील डॉक्टरांनी एकत्र काम करून उल्लेखनीय समन्वय दाखवला. या यशस्वी प्रत्यारोपणात डॉ. राकेश शिंदे, डॉ. विक्रांत सातव, डॉ. शशिकांत भनगे, डॉ. शार्दुल दाते, डॉ. संगीता चंद्रशेखर, डॉ. नीलेश वसमतकर आणि डॉ. बी. डी. बांदे यांचा मोलाचा सहभाग होता. त्यांच्या समवेत नर्सिंग, अॅनेस्थेसिया व पोस्ट-सर्जिकल केअर विभागांचाही उल्लेखनीय सहभाग राहिला.
ही वैद्यकीय यशोगाथा पुणे शहराच्या आरोग्य सेवेला जागतिक स्तरावर अधोरेखित करते. रक्तगट न जुळतानाही प्रत्यारोपण शक्य आहे, हे या प्रकरणातून स्पष्ट होते – पण त्यासाठी तांत्रिक कौशल्य, वेळेवर निदान, आणि अनुभवसंपन्न टीम यांची सांगड अत्यावश्यक असते. रुग्ण आता प्रकृती स्थिर असून त्याच्या जीवनाला नवा श्वास मिळाल्याची समाधानकारक माहिती डॉक्टरांनी दिली आहे.