Pune News: नियतीचा न्याय! 47 वर्षांनंतर लेकाने वडिलांच्या पराभवाचा घेतला बदला, वानवडीत ऐतिहासिक विजय

0
Pune News: नियतीचा न्याय! 47 वर्षांनंतर लेकाने वडिलांच्या पराभवाचा घेतला बदला, वानवडीत ऐतिहासिक विजय

Pune News: नियतीचा न्याय! 47 वर्षांनंतर लेकाने वडिलांच्या पराभवाचा घेतला बदला, वानवडीत ऐतिहासिक विजय

Pune News: वानवडी प्रभागात प्रशांत जगताप यांनी 47 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या पराभवाचा बदला घेतला. 1979 च्या राजकीय लढतीचा हिशोब 2026 मध्ये पूर्ण झाला.

पुणे १८ जानेवारी २०२५: पुणे महापालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत अनेक धक्कादायक आणि ऐतिहासिक निकाल समोर आले आहेत. भाजपने एकहाती सत्ता मिळवत पुण्याच्या राजकारणात वर्चस्व प्रस्थापित केले, तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांना मोठा फटका बसला. अनेक ज्येष्ठ नगरसेवक आणि बड्या नेत्यांचा पराभव झाला. मात्र या सर्वांमध्ये वानवडी प्रभागातील एक निकाल विशेष चर्चेचा ठरला असून, तब्बल 47 वर्षांपूर्वीच्या राजकीय संघर्षाची आठवण पुन्हा ताजी झाली आहे.

हा निकाल म्हणजे नियतीच्या न्यायाचे जिवंत उदाहरण मानले जात आहे. 1979 साली वानवडी प्रभागातून बाळासाहेब शिवरकर आणि वामनराव जगताप यांच्यात थेट लढत झाली होती. त्या वेळी काँग्रेसच्या ‘पंजा’ चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या बाळासाहेब शिवरकर यांनी वामनराव जगताप यांचा पराभव केला होता. हा पराभव जगताप कुटुंबासाठी वेदनादायी ठरला होता. तब्बल 47 वर्षांनंतर, 2026 साली, वामनराव जगताप यांचे नातू प्रशांत जगताप यांनी हा जुना हिशोब चुकता केला आहे.

प्रशांत जगताप यांनी या निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसने त्यांच्या ताकदीवर विश्वास ठेवत वानवडी प्रभाग क्रमांक 18-डी मधून उमेदवारी दिली. त्यांच्या समोर माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांचे पुत्र अभिजीत शिवरकर यांचे आव्हान होते. अभिजीत शिवरकर यांनीही ऐन निवडणुकीपूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि भाजपकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे ही लढत केवळ दोन उमेदवारांमधील नव्हे, तर दोन राजकीय घराण्यांतील प्रतिष्ठेची लढाई ठरली.

निवडणूक प्रचारादरम्यान वानवडी परिसरात प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. सुरुवातीच्या मतमोजणी फेऱ्यांमध्ये प्रशांत जगताप पिछाडीवर पडले होते. मात्र नंतरच्या राऊंडमध्ये त्यांनी आघाडी घेतली आणि अखेर दणदणीत विजयाची नोंद केली. विशेष म्हणजे हा विजय त्यांनी काँग्रेसच्या ‘पंजा’ या त्याच चिन्हावर मिळवला, ज्या चिन्हावर 1979 साली त्यांच्या आजोबांचा पराभव झाला होता. त्यामुळे हा विजय केवळ राजकीय नसून भावनिकदृष्ट्याही महत्त्वाचा ठरला आहे.

या विजयाबाबत प्रतिक्रिया देताना प्रशांत जगताप यांनी “तब्बल 47 वर्षांनंतर नियतीचा न्याय पूर्ण झाला” असे म्हटले. या निकालामुळे वानवडीसह संपूर्ण पुण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने पुण्यात एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रशांत जगताप यांनी आपली राजकीय वाट बदलली होती. त्यांना पराभूत करण्यासाठी अजित पवारांनी विशेष प्रयत्न केले, मात्र ते अपयशी ठरले.

पुणे महापालिकेच्या निकालात भाजपने तब्बल 123 जागा जिंकत मोठी मुसंडी मारली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 21 जागांवर समाधान मानावे लागले, तर काँग्रेसने 16 जागा जिंकत तिसरा क्रमांक पटकावला. या पार्श्वभूमीवर प्रशांत जगताप यांचा विजय हा केवळ एका प्रभागापुरता मर्यादित न राहता, पुण्याच्या राजकारणातील एक ऐतिहासिक आणि प्रतीकात्मक घटना ठरली आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *