Pune News : हॉटेल रेटिंग, वर्क फ्रॉम होम पडले महाग; पुण्यात सायबर चोरट्यांनी 1.61 कोटींचा गंडा
Pune News : हॉटेल रेटिंग, वर्क फ्रॉम होम पडले महाग; पुण्यात सायबर चोरट्यांनी 1.61 कोटींचा गंडा
Pune Cyber Crime Update: शेअर ट्रेडिंग, वर्क फ्रॉम होम, हॉटेल रेटिंगच्या नावाखाली पुण्यात 13 प्रकरणांत 1.61 कोटींची फसवणूक; सायबर चोरट्यांचा नवा फंडा उघड.
पुणे २२ डिसेंबर २०२५ : पुणे शहरात सायबर गुन्हेगारांनी आपला नवा डाव टाकत सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अवघ्या काही दिवसांत वेगवेगळ्या १३ सायबर गुन्ह्यांमध्ये तब्बल १ कोटी ६१ लाख ९८ हजार ९५२ रुपयांचा गंडा घालण्यात आला असून, या प्रकारांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक, ऑनलाईन टास्क, वर्क फ्रॉम होम, हॉटेल रेटिंग तसेच सरकारी यंत्रणांची भीती दाखवून पैसे उकळण्याचे प्रकार या फसवणुकीत प्रामुख्याने समोर आले आहेत.
थानोरी परिसरात राहणाऱ्या एका ३९ वर्षीय महिलेला स्टॉक ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी २७ लाख ८० हजार ९५७ रुपयांची फसवणूक केली. त्याचप्रमाणे वानवडी भागातील ५७ वर्षीय व्यक्तीला यूएसडीटी खरेदीच्या नावाखाली २७ लाख ८३ हजार ७४४ रुपयांना गंडवण्यात आले आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करून विश्वास संपादन करण्यात आला आणि नंतर हळूहळू मोठी रक्कम उकळण्यात आली.
घरबसल्या काम देण्याच्या नावाखाली फसवणुकीचे सत्रही जोरात सुरू असल्याचे दिसून येत आहे. सिंहगड रोडवरील आनंदनगर भागात एका महिलेला वर्क फ्रॉम होमचे आकर्षक काम देण्याचे आमिष दाखवून ३ लाख ५० हजार ५४० रुपये लुटण्यात आले. कोंढवा आणि लोहगाव परिसरात ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यास जादा पैसे मिळतील, असे सांगून नागरिकांकडून लाखो रुपये उकळण्यात आले आहेत.
सायबर चोरट्यांनी थेट भीती दाखवून पैसे उकळण्याचाही मार्ग अवलंबला आहे. कोथरूडमधील एका ५५ वर्षीय महिलेला आपण मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकलो असल्याचे सांगण्यात आले. सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून सायबर गुन्हेगारांनी या महिलेकडून १९ लाख ३० हजार रुपये उकळले. याच परिसरात राहणाऱ्या एका ६६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला जादा परताव्याचे आमिष दाखवून ११ लाख ६७ हजार ५५८ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
शेअर ट्रेडिंग आणि गुंतवणुकीच्या नावाखालीही अनेकांना लक्ष्य करण्यात आले आहे. वारजे माळवाडी परिसरातील एका ४४ वर्षीय व्यक्तीला शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून १६ लाख २१ हजार रुपयांना गंडवण्यात आले. हिंगणे भागात ११ लाख ६५ हजार, तर वडगाव शेरी परिसरात १३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची नोंद आहे.
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा म्हणून हॉटेल रेटिंग देण्याच्या नावाखाली फसवणूकही समोर आली आहे. धायरी येथील एका तरुणाला हॉटेलला चांगले रेटिंग दिल्यास पैसे मिळतील, असे सांगून ३ लाख ४ हजार १०० रुपयांचा गंडा घालण्यात आला. तसेच आंबेगाव आणि वाघोली परिसरात संशयास्पद लिंक पाठवून नागरिकांच्या बँक खात्यांमधून थेट पैसे पळवण्याचे प्रकार घडले आहेत.
या सर्व प्रकरणांमध्ये पोलिसांनी सायबर गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे. नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता संशयास्पद कॉल, लिंक किंवा ऑनलाईन गुंतवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. पुण्यात सायबर चोरट्यांचा वाढता सुळसुळाट ही गंभीर बाब ठरत असून, सतर्कताच यावरचा एकमेव उपाय असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information