पुणे रेल्वे पोलिसांची मोठी कामगिरी; मोबाईल चोरी करणारे दोन आरोपी अटकेत, १.९० लाखांचे २० मोबाईल जप्त
पुणे रेल्वे पोलिसांनी मंगळवार पेठेत दोन आरोपींना अटक करून २० मोबाईल फोन जप्त केले.
पुणे रेल्वे पोलिसांनी मंगळवार पेठेत दोन आरोपींना अटक करून २० मोबाईल फोन जप्त केले. आरोपी रेल्वे प्रवाशांचे मोबाईल चोरत होते.
सायली मेमाणे
पुणे ५ सप्टेंबर २०२५ : पुणे रेल्वे पोलिसांनी मोबाईल चोरी प्रकरण उघडकीस आणत रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. तक्रारदार रुतुराज दिलीपराव काटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई सुरू झाली. त्यांचे मित्र संजय मडिया डिन्डोड हे ३० ऑगस्ट २०२५ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पुणे रेल्वे स्टेशनवर दानापूर एक्सप्रेसच्या जनरल डब्यात चढत असताना त्यांचा १५,००० रुपये किंमतीचा विवो मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. या प्रकरणी पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३६३/२०२५ भादंवि कलम ३०३ (२) नुसार नोंद करण्यात आली.
तपासादरम्यान पोलिसांना गोपनीय सूत्रामार्फत माहिती मिळाली की, मंगळवार पेठेतील सिग्नल चौकाजवळील झोपड्यांमध्ये काही संशयित आरोपी राहतात आणि त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर चोरीचे मोबाईल आहेत. त्यानुसार पुणे रेल्वे पोलिसांच्या सर्व्हेलन्स पथकाने आरपीएफ पुणे युनिटसोबत संयुक्त कारवाई करत छापा मारला. पोलिसांना पाहून संशयित पळण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना शिताफीने पकडण्यात आले.
अटक केलेल्या आरोपींची नावे ३२ वर्षीय बुद्धराज मोरपाल बागडी आणि २२ वर्षीय अमरलाल हंसराज बागडी अशी असून, ते मूळचे राजस्थानमधील बारा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. पुण्यात मंगळवार पेठ परिसरात ते सध्या वास्तव्यास होते. त्यांच्या झोपडीची झडती घेतली असता एकूण २० मोबाईल फोन सापडले. यामध्ये चोरी गेलेला विवो मोबाईल तसेच इतर वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल मिळून १,९०,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चौकशीत आरोपींनी कबुली दिली की ते प्रामुख्याने रेल्वे प्रवाशांकडून आणि गर्दीच्या ठिकाणांहून मोबाईल चोरून कमी दरात जुन्या बाजारात विकतात. त्यांची पद्धत म्हणजे प्रवासी गाडीत चढताना किंवा गर्दीत मोबाईल हिसकावणे आणि लगेच पसार होणे अशी होती.
या यशस्वी कारवाईचे मार्गदर्शन मा. पोलीस अधीक्षक (लोहमार्ग) पुणे श्रीमती अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक रोहीदास पवार, उपविभागीय अधिकारी जयराम पायगुडे यांनी केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद खोपीकर यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय यशवंत साळुंके आणि पोलीस कर्मचारी सुनिल कदम, अनिल दांगट, निलेश बिडकर, सिध्दार्थ वाघमारे, नेमाजी केंद्र, मारटकर, छाया चव्हाण, शेख यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच आरपीएफचे निरीक्षक यादव, उपनिरीक्षक लाड, आणि जवान युवराज गायकवाड, विशाल माने, रसुल सय्यद यांनीही या कारवाईत मोलाचे योगदान दिले.
पोलिसांनी सांगितले की हा प्रकार रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठा धोका आहे. पुढील काळात अशा प्रकारच्या चोरी रोखण्यासाठी रेल्वे स्टेशन परिसरात अधिक गस्त आणि देखरेख वाढवली जाणार आहे. प्रवाशांनीही सतर्क राहावे, आपली मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवावी आणि चोरी झाल्यास त्वरित रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
या जलद आणि समन्वयपूर्ण कारवाईमुळे चोरीचा माल परत मिळवण्यात पोलिसांना यश आले असून, पुण्यातील मोबाईल चोरीच्या टोळीला मोठा धक्का बसला आहे. पुणे रेल्वे पोलिसांनी पुन्हा एकदा प्रभावी कारवाई करून नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे.
ही कारवाई पोलिसांचे कार्यक्षमतेचे, टीमवर्कचे आणि जनतेप्रती असलेल्या बांधिलकीचे उत्तम उदाहरण मानले जात आहे.