Pune Sinhgad Road Accident: ट्रकच्या धडकेत सई भागवतचा मृत्यू, पुण्यात शोककळा

0
ट्रकच्या धडकेत सई भागवतचा मृत्यू, पुण्यात शोककळा

ट्रकच्या धडकेत सई भागवतचा मृत्यू, पुण्यात शोककळा

सिंहगड रोडवर ट्रकच्या धडकेत कॉलेजला जाणाऱ्या 19 वर्षीय सई भागवतचा मृत्यू. दुसरीकडे, खडकीत टेम्पोच्या धडकेत दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू.

सायली मेमाणे

पुणे २८ जून २०२५ : पुणे शहर पुन्हा एकदा रस्ते अपघाताच्या भीषण घटनांमुळे हादरले आहे. गुरुवारी सिंहगड रस्ता परिसरात एका भरधाव ट्रकने कॉलेजला जाणाऱ्या १९ वर्षीय सई भागवत या तरुणीला चिरडले. ही दुर्घटना तुकाईनगर परिसरात दुपारी घडली. सई स. प. महाविद्यालयात कला शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. ती दुचाकीवरून घरी जात असताना ट्रकने तिला जोरात धडक दिली, ज्यामध्ये तिच्या डोक्याला गंभीर इजा झाली. तिला तातडीने खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

या दुर्घटनेनंतर सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात सईच्या आई दीपश्री भागवत यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर चालक पळून गेला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. घटनास्थळी सहायक पोलीस आयुक्त अजय परमार आणि वरिष्ठ निरीक्षक दिलीप दाईंगडे यांनी भेट दिली. शहरात यापूर्वीही अशाच अपघातांमध्ये अनेक निष्पाप जीव गेले असून गेल्या काही महिन्यांत १७ नागरिकांचे प्राण अशा प्रकारच्या घटनांमध्ये गेले आहेत. विशेष म्हणजे, डंपर, ट्रक, सिमेंट मिक्सर यांसारख्या अवजड वाहनांना शहराच्या मुख्य रस्त्यांवर बंदी असतानाही काही चालक बिनधास्तपणे नियम मोडत वाहतूक करताना दिसतात.

या दुर्घटनेची घटना ताजी असतानाच दुसरीकडे खडकीच्या सर्वत्र विहार परिसरात आणखी एक हृदयद्रावक अपघात घडला. दीड वर्षांची बालिका आईजा शेख घरासमोर खेळत असताना एका भरधाव टेम्पोने तिला चिरडले. तिची आई झेबा शेख यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, या प्रकरणात टेम्पो चालकाविरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा चालकदेखील अपघातानंतर पसार झाला असून, त्याचा शोध सुरु आहे.

पुण्यात दररोज वाढणारी वाहतूक आणि त्याचसोबत होणाऱ्या अपघातांचे प्रमाण चिंताजनक स्तरावर पोहोचले आहे. नागरिक आणि विशेषतः तरुण वर्गाच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि वाहतूक विभागाने मिळून अशा घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed