पुण्यात धक्कादायक आकडेवारी : दीड वर्षांत 40,000 नागरिकांवर मोकाट कुत्र्यांचे हल्ले
पुण्यात धक्कादायक आकडेवारी : दीड वर्षांत 40,000 नागरिकांवर मोकाट कुत्र्यांचे हल्ले
पुण्यात गेल्या दीड वर्षांत तब्बल 40,000 पेक्षा अधिक नागरिकांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती समोर आली. रस्त्यांवर टोळक्याने फिरणाऱ्या कुत्र्यांमुळे नागरिक भयभीत, महापालिकेकडे बंदोबस्ताची मागणी.
सायली मेमाणे
पुणे ११ सप्टेंबर २०२५ :पुणे शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. गेल्या दीड वर्षांत तब्बल 40,000 हून अधिक नागरिकांवर या कुत्र्यांनी हल्ला करून चावा घेतल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. ही माहिती थेट पुणे महापालिकेकडूनच मिळाल्याने परिस्थिती किती बिकट आहे हे स्पष्ट होते.
शहरातील विविध चौकात, रस्त्यांवर आणि वस्त्यांमध्ये मोकाट कुत्र्यांचे टोळके दिवसाढवळ्या फिरताना दिसतात. अनेकदा हे कुत्रे गटाने नागरिकांवर धावून जातात आणि चावा घेतात. यामुळे शाळेत जाणारी मुले, सकाळी फिरायला जाणारे ज्येष्ठ नागरिक तसेच रात्री कामावरून परतणारे तरुण या सर्वांना मोठा धोका निर्माण झाला आहे. काही भागात कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे गंभीर जखमी होऊन रुग्णालयात दाखल करण्याच्या घटना वाढल्या आहेत.
महापालिकेच्या आकडेवारीनुसार, कुत्र्यांच्या चाव्यामुळे पीडितांची संख्या दर महिन्याला मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शहरातील जीवनमानावर याचा थेट परिणाम होत आहे. विशेष म्हणजे, नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप होत आहे.
तज्ज्ञांच्या मते, शहरातील कचऱ्याचा प्रश्न आणि रस्त्यावर फेकले जाणारे अन्न हे मोकाट कुत्र्यांच्या वाढीला मुख्यत्वे कारणीभूत आहेत. कचराकुंड्या व्यवस्थित न उचलल्याने आणि वस्त्यांमध्ये अन्नाचे उघड्यावर टाकले जाणारे अवशेष यामुळे कुत्र्यांचे टोळके मोठ्या प्रमाणात त्या भागात जमा होतात. यामुळे नागरिकांवर हल्ल्यांची शक्यता अधिक वाढते.
दरम्यान, अनेक स्वयंसेवी संस्था प्राण्यांच्या संरक्षणासाठी पुढे येत असल्या तरी नागरिकांच्या सुरक्षिततेचाही विचार महत्त्वाचा आहे. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण आणि आश्रयस्थळांची सोय करण्यासोबतच कचऱ्याच्या व्यवस्थापनावरही काटेकोर पावले उचलणे गरजेचे आहे.
नागरिकांकडून वारंवार अशी मागणी होत आहे की, सर्व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात. अन्यथा, नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
या पार्श्वभूमीवर, महापालिकेने कुत्र्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण आणि तक्रारींवर त्वरित प्रतिसाद देण्यासाठी विशेष मोहिमा राबविण्याची गरज आहे. तसेच शाळा, सोसायट्या आणि सार्वजनिक ठिकाणी जागरूकता निर्माण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
मोकाट कुत्र्यांचा प्रश्न हा फक्त प्रशासनाचा नाही, तर सर्व समाजाचा असून, नागरिकांनीही कचरा व्यवस्थापनात आणि जबाबदार वर्तनात योगदान द्यावे लागेल. अन्यथा पुणेकरांना येणाऱ्या काळात या समस्येचा अधिक तीव्रतेने सामना करावा लागेल.