Pune News: कात्रज-किवळे मार्गावर अवजड वाहनांना नो एन्ट्री, वेळ आणि ठिकाण वाचा
कात्रज-किवळे मार्गावर अवजड वाहनांना नो एन्ट्री, वेळ आणि ठिकाण वाचा
पुण्यातील कात्रज-किवळे बाह्यवळण मार्गावर 15 ऑक्टोबरपासून अवजड वाहनांवर बंदी; सकाळी 8–11 वाजता पुणे ते मुंबई आणि संध्याकाळी 5–9 वाजता मुंबई ते पुणे दिशेत लागू, अत्यावश्यक वाहने वगळली.
सायली मेमाणे
पुणे १० ऑक्टोबर २०२५ : पुण्यातील लाखो नोकरदार आणि स्थानिक रहिवाशांसाठी एक दिलासा देणारी बातमी आली आहे. पुणे शहराचे आयटी हब असलेल्या हिंजवडीकडे जाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कात्रज-किवळे बाह्यवळण मार्गावर अवजड वाहनांना ठराविक वेळेत नो एन्ट्री लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय 15 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार आहे.
या मार्गावर नागरिकीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. मुंबई-बेंगलोर महामार्गावर थेट जाणारी मल्टी अॅक्सल ट्रक, कंटेनर तसेच ट्रेलर्स सारखी मोठी वाहने देखील या मार्गाचा वापर करतात. सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आणि अपघातांची शक्यता वाढते.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ‘स्लो मुव्हिंग’ वाहनांवर बंदी घालण्याची गरज व्यक्त केली होती. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी कात्रजकिवळे मार्गावर हा महत्त्वाचा नियम लागू केला आहे. नियम केवळ शहरातून न जाता थेट दुसऱ्या शहरात जाणारी वाहने थांबवण्यासाठी आहे.
सकाळी, 8 ते 11 वाजता पुणे ते मुंबईकडे जाणाऱ्या लेनमध्ये बंदी लागू असेल. यामध्ये सातारा व कोल्हापूर कडून येणारी अवजड वाहने शिंदेवाडी टोलनाक्यावर थांबवली जातील. यामुळे हिंजवडीकडे जाणाऱ्या नोकरदारांचा प्रवास सुरळीत होईल.
संध्याकाळी, 5 ते 9 वाजता मुंबई ते पुणे दिशेत बंदी लागू असेल. यावेळी अवजड वाहने उर्सेवाडी टोलनाका किंवा वडगाव फाटा येथे थांबवली जातील. या निर्णयामुळे हिंजवडीतून घरी परतणाऱ्या प्रवाशांना कोंडीतून मुक्ती मिळेल.
या बंदीमधून पेट्रोल, डिझेल, दूध, शेतीमाल तसेच पुणे शहराच्या अंतर्गत भागात माल घेऊन जाणारी किंवा येणारी अत्यावश्यक सेवा वाहने वगळण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिकांना या नियमामुळे कोणताही अडथळा येणार नाही.
पुणेकरांच्या सुरक्षित आणि जलद प्रवासासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरतो. वाहतूक पोलिसांनी संबंधित विभागांना त्वरित अंमलबजावणीसाठी सूचना दिल्या आहेत. शहरातील गर्दी कमी करणे आणि अपघात टाळण्यासाठी हे पाऊल प्रभावी ठरणार आहे.