Pune: पुनीत बालन क्रिकेट अकॅडमीची घोषणा; बीसीसीआय मानकांची देशातील सर्वात मोठी खासगी क्रिकेट सुविधा

Pune: पुनीत बालन क्रिकेट अकॅडमीची घोषणा; बीसीसीआय मानकांची देशातील सर्वात मोठी खासगी क्रिकेट सुविधा
पुण्यात ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची घोषणा. बीसीसीआय मानकांसह देशातील सर्वात मोठा प्रायव्हेट क्रिकेट सेटअप. अत्याधुनिक सुविधा, महिला खेळाडूंसाठी विशेष बॅचेस आणि जागतिक दर्जाचे प्रशिक्षण उपलब्ध.
६ डिसेंबर २०२५ : पुण्यात तरुण क्रिकेटपटूंसाठी एक ऐतिहासिक संधी उपलब्ध झाली आहे. युवा उद्योजक आणि ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष पुनीत बालन यांनी ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची घोषणा केली असून, ही अकॅडमी बीसीसीआय मानकांनुसार देशातील सर्वात मोठ्या खासगी क्रिकेट सेटअपपैकी एक ठरणार आहे. जागतिक स्तरावरील सुविधा आणि व्यावसायिक पातळीवरील प्रशिक्षण या अकॅडमीमध्ये उपलब्ध करून दिले जाणार असल्याने, क्रिकेट क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे.

भारतातील क्रिकेटवरील प्रचंड प्रेम, वाढती स्पर्धा आणि दर्जेदार प्रशिक्षणाची आवश्यकता लक्षात घेऊन ही अकॅडमी उभारण्यात आल्याचे पुनीत बालन यांनी सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, दोन प्रमुख मैदानांची निवड करण्यात आली असून सिंहगड कॉलेज वडगाव आणि लोणावळा येथील क्रिकेट मैदानांचा यात समावेश आहे. या मैदानांवर बीसीसीआयच्या मानकांनुसार सर्व सुविधा उपलब्ध असतील. पुढील सिझनपासून इथे बीसीसीआयच्या अधिकृत सामन्यांचे आयोजनही होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. प्रशिक्षक म्हणून बीसीसीआय मान्यताप्राप्त तज्ज्ञांची नियुक्ती केली जाणार आहे, ज्यामुळे प्रशिक्षणाची गुणवत्ता लक्षणीयरीत्या वाढणार आहे.
अकॅडमीचे प्रवेश 1 जानेवारीपासून सुरू होतील आणि प्रत्यक्ष कोचिंग 15 जानेवारीपासून दिले जाईल. ही व्यावसायिक क्रिकेट अकॅडमी असल्यामुळे प्रवेश मर्यादित असतील आणि निवड प्रक्रियेत पात्रता, कौशल्य आणि शारीरिक तंदुरुस्ती विचारात घेतली जाणार आहे. पुणे आणि महाराष्ट्रातील तरुणांसाठी ही अकॅडमी एक मार्गदर्शक परिवर्तन ठरेल, असा विश्वास अनेक क्रीडापटू आणि प्रशिक्षक व्यक्त करत आहेत.
अकॅडमीमध्ये वर्षभर सराव सुरू राहील याची विशेष काळजी घेतली असून प्रत्येक मैदानावर पावसाळ्यातही सरावात खंड पडू नये म्हणून इनडोअर तीन विकेट्सची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. याशिवाय खेळाडूंसाठी होस्टेल सुविधा, अत्याधुनिक जिम, जलतरण तलाव, फिटनेस कोच, स्पोर्ट्स कंडिशनिंग यांसारख्या सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध असतील. बाहेरगावच्या खेळाडूंसाठी ही व्यवस्था अत्यंत सोयीची ठरणार आहे. सर्वांगीण फिटनेस आणि व्यावसायिक प्रशिक्षणाच्या माध्यमातून खेळाडूंच्या शारीरिक आणि तांत्रिक कौशल्यांचा विकास करण्यावर या अकॅडमीचा भर असेल.
महिलांसाठी स्वतंत्र बॅचेसची तरतूद ही अकॅडमीची एक महत्त्वाची वैशिष्ट्यपूर्ण बाब ठरणार आहे. महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने मुलींना सवलतीच्या दरात प्रशिक्षण दिले जाणार आहे. वाढत्या महिला क्रिकेट स्पर्धा आणि राष्ट्रीय स्तरावर महिलांच्या सहभागाचे प्रमाण पाहता हा उपक्रम विशेष महत्त्वाचा ठरणार आहे.
खेळाडूंना स्पर्धात्मक अनुभव देण्यासाठी पीबीजी ज्युडीसियल क्रिकेट क्लबमार्फत विविध निमंत्रित स्पर्धांमध्ये खेळण्याच्या संधी दिल्या जातील. त्यामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास वाढेल आणि व्यावहारिक अनुभवही मिळेल.
अकॅडमीच्या घोषणेवेळी बोलताना पुनीत बालन म्हणाले, “ही अकॅडमी उदयोन्मुख आणि गुणी खेळाडूंना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देण्यासाठी उभारण्यात आली आहे. आमच्या तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनातून तरुण क्रिकेटपटूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी मिळेल आणि महाराष्ट्राचा क्रीडा क्षेत्रातील नावलौकिक वाढण्यास मदत होईल.”
या संपूर्ण प्रकल्पामुळे पुण्यात व्यावसायिक क्रिकेट प्रशिक्षणासाठी एक नवे पर्व सुरू झाले असून, क्रिकेटमध्ये करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुणांना हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information
FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare